नागपुरात भाज्या महागल्या, स्वयंपाकघरात कडधान्यांची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:56 AM2018-05-21T11:56:37+5:302018-05-21T11:56:45+5:30
सध्या कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजारात स्थानिक शेतकरी आणि अन्य ठिकाणांहून भाज्यांची आवक कमी असून तापत्या उन्हामुळे भाज्या महागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजारात स्थानिक शेतकरी आणि अन्य ठिकाणांहून भाज्यांची आवक कमी असून तापत्या उन्हामुळे भाज्या महागल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना स्वयंपाकघरात भाज्यांऐवजी कडधान्याचा उपयोग जास्त प्रमाणात करावा लागत आहे.
नागपूर जिल्ह्यात सिंचनाच्या सोई असलेले १० टक्के शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. अन्य ठिकाणांवरून येणाऱ्या भाज्या वाहतूक खर्चासह ठोक बाजारात जास्त भावात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना किरकोळमध्ये जास्त भावातच खरेदी कराव्या लागत आहे.
पहिला पाऊस येईपर्यंत भाज्या जास्त किमतीत खरेदी कराव्या लागतील. भाज्या महागल्याने शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे महात्मा फुले भाजी व फळे अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
टोमॅटो स्वस्तच, हिरवी मिरची व कोथिंबीर महाग
स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटोची आवक वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटो ३ ते ४ रुपये किलो दराने विकले गेले. सध्या ठोक बाजारात दर्जानुसार ८ ते १२ रुपये किलो भाव आहे. पण किरकोळ बाजारात २० रुपये किलो दराने खरेदी करावी लागत आहे. टोमॅटोची आवक नाशिक आणि संगमनेर येथून आहे. स्थानिक उत्पादकांकडून कोथिंबीरची आवक बंद झाली असून सध्या नांदेड, छिंदवाडा येथून बाजारात विक्रीस येत आहे. वाढीव वाहतूक खर्चामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर महागच आहे. सध्या किरकोळमध्ये ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हिरवी मिरचीची आवक परतवाडा, यवतमाळ आणि रायपूर येथून आहे. ठोकमध्ये दर्जानुसार प्रति किलो २० ते २५ रुपये भाव असले तरीही किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
फूलकोबी, पत्ताकोबी, पालक स्वस्त
नागपूर जिल्ह्यातील पाचगाव, दहेगाव, सावनेर, कळमेश्वर आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांकडून फूलकोबी, पालक आणि भेंडी कॉटन मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. त्यांना भावही चांगला मिळत आहे. ग्राहकांना किफायत दरात खरेदीची संधी आहे. वर्षभर मुलताई येथून बाजारात येणारी पत्ताकोबीची आवक चांगली आहे. त्यामुळे ठोकमध्ये भाव ८ ते १० रुपये आहेत. कॉटन मार्केटमध्ये ९० ते १०० लहानमोठ्या गाड्यांची आवक आहे. सध्या अधिकमासामुळे भाज्यांचा उठाव कमी आहे.
कांदे स्वस्त, बटाटे वधारले
कळमना बाजारात प्रति किलो १० ते १२ रुपये असलेले कांद्याचे भाव ५ ते ७ रुपयांपर्यंत घसरले आहेत. ठोक बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च आणि कमिशन परवडत नसल्यामुळे अनेक शेतकरी चौकाच्या कडेला गाडी लावून कांद्याची विक्री करीत आहेत. कळमना बाजारात दररोज लाल आणि पांढऱ्या कांद्याची जवळपास २५ ते ३० ट्रक (एक ट्रक १८ टन) आवक आहे. पांढरे कांद्याचे भाव दर्जानुसार ५ ते ७ रुपये आणि लाल कांदे ६ ते ८ रुपये आहेत. सध्या कळमन्यात धुळे, अमरावती, अकोला जिल्ह्यातून पांढरे कांदे आणि बुलडाणा जिल्ह्यातून लाल कांदे विक्रीस येत आहेत. यंदा देशाच्या सर्वच राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी पीक निघाले आहे. कळमन्यात बटाट्याचे भाव प्रति किलो १४ ते १६ रुपये तर किरकोळमध्ये २५ रुपयांवर पोहोचले आहेत. दररोज १५ ते २० ट्रकची आवक आहे.