धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 02:05 PM2022-04-30T14:05:15+5:302022-04-30T14:08:01+5:30
शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.
दयानंद पाईकराव
नागपूर : आरोग्य उत्तम राहावे म्हणून आपण महाग असल्या तरी, पालेभाज्या बाजारातून खरेदी करून आणून खातोच. परंतु या पालेभाज्या विषयुक्त असल्याचे सांगितल्यास, ते कोणालाच पटणार नाही. परंतु हे धक्कादायक वास्तव आहे.
नागपूरशेजारील नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे केमिकलयुक्त विषारी पाणी वापरून भाजीपाला आणि इतर पिके पिकवली जात आहेत. ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘ऑन दि स्पॉट’ पाहणीत हे घाबरवून सोडणारे चित्र समोर आले. हा विषारी भाजीपाला खाऊन नागपूरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. नाग नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहे. मात्र, तोवर नागपूर शहरातील सांडपाणी, सिवरेजचे पाणी नाग नदीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, यासाठी महापालिकेने दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
नाग नदीवर जागोजागी मोटरपंप
नाग नदीपासून अनेक शेतकऱ्यांची शेती २०० मीटर ते पाऊण किलोमीटरवर आहे. नाग नदीच्या काठावर जागोजागी शेकडो पाण्याचे मोटरपंप बसविलेले आहेत. जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातूनही शेतकरी हे दूषित पाणी आपल्या शेतापर्यंत घेऊन जात असल्याचे आढळून आले.
दूषित पाण्यावर पिकते मेथी, पालक, कोबी
- नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर करून गहू, चेच भाजी, पालक, मेथी, अंबाडी, भेंडी, ढेमस, संत्रा, लिंबू, सोयाबीन, वांगी, लवकी, सांबार, कोबी ही भाजीपाला पिके घेण्यात येतात. त्यासाठी नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस खराब होतो. तसेच या पाण्यावर घेतलेल्या भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी मान्य केली.
या गावातील शेती नाग नदीच्या पाण्यावर...
- नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे दूषित पाणी वापरून विषयुक्त भाजीपाला पिकवला जातो. यात पुणापूर, पावनगाव, धारगाव, शिरपूर, आसोली, महालगाव, कापसी, आरंभा, तितुर, तरोडी, खेडी, कुही, मांढळ आदी गावांचा समावेश आहे.