उपराजधानीत गाडी गेली चोरी, अन् चालान आले दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:49 AM2018-02-22T11:49:06+5:302018-02-22T12:00:20+5:30
उपराजधानीत ‘हेल्मेट’सक्ती सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस कमालीचे ‘अलर्ट’ झाले आहेत. वाहतूक पोलिसांचा असाच ‘अलर्टनेस’ नागपुरातील एका युवकाला मोठा धक्का देऊन गेला आहे.
संजय लचुरिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत ‘हेल्मेट’सक्ती सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस कमालीचे ‘अलर्ट’ झाले आहेत. अनेकदा तर ते इतके सतर्क असतात की वाहनचालक किंवा गाडीपेक्षा त्यांचे लक्ष ‘हेल्मेट’वसुलीच्या ‘टार्गेट’कडेच असते. वाहतूक पोलिसांचा असाच ‘अलर्टनेस’ नागपुरातील एका युवकाला मोठा धक्का देऊन गेला आहे.
दहा महिन्यांपूर्वी चोरी गेलेल्या गाडीचा शोध लागेल, ही अपेक्षा सोडली असताना चक्क ‘हेल्मेट’ न घालता तीच गाडी चालविल्याबद्दल त्याला चालान आले आहे. जर गाडीच चोरी गेली आहे तर मग आपल्याला ‘चालान’ कसे आले, या प्रश्नाने तो बेचैन झाला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी बुद्धनगर येथील रहिवासी आकाश डबरे हा आपल्या आईसोबत एमएच ४९ एम २०६५ या क्रमांकाच्या मोपेडने रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी सीताबर्डीवरील व्हेरायटी चौकात आला होता. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी लावली. काही वेळानंतर गाडी चोरीस गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने लगेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ५ एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर गाडीचा कुठलाही पत्ता लागला नाही. त्याने अनेकदा पोलिसांकडे विचारणा केली. मात्र शोध सुरू आहे, असेच उत्तर त्याला मिळाले. त्याने गाडी परत मिळेल, अशी अपेक्षाच सोडली होती. मात्र १६ फेब्रुवारी रोजी पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या एका लिफाफ्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. दहा महिन्यांपूर्वी जी गाडी चोरी गेली आहे, तिच्यासाठी ‘हेल्मेट’ चालान पाठविण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी झाल्याच्या आठवडाभरानंतर म्हणजेच ११ एप्रिल २०१७ रोजी तुकडोजी चौकात विना हेल्मेट गाडी चालविल्याबद्दल हे चालान पाठविण्यात आले होते. याबाबत त्याने लगेच सीताबर्डी पोलीस ठाण्याला माहिती दिली. मात्र यासंदर्भातील पत्रावर शिक्का देण्यासदेखील पोलिसांकडून वेळकाढूपणा करण्यात आला, असे त्याने सांगितले.
१० महिन्यानंतर कसे आले ‘चालान’?
या प्रकरणामुळे वाहतूक पोलिसांचे काम किती संथगतीने चालते हेदेखील समोर आले आहे. एप्रिल महिन्यात अज्ञात व्यक्ती विनाहेल्मेट चोरी गेलेली गाडी चालवत असल्याचे दिसून आली आणि त्याचे चालान २८ आॅगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आले. याहून अचंबित करण्याची बाब म्हणजे या चालानची प्रत्यक्ष ‘डिलिव्हरी’ १६ फेब्रुवारी २०१८ रोजी झाली. दहा महिने ‘चालान’ काय नागपूर दर्शन करत होते की काय, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
खुलेआम फिरताहेत चोर
आकाशची गाडी ४ एप्रिल रोजी चोरी गेली होती आणि ११ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्ती विनाहेल्मेट गाडी चालवत असल्यासाठी चालान जारी करण्यात आले. याचाच अर्थ चोरीची तक्रार झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवर खुलेआम चोर गाडी फिरवत होता. याची नोंद घेण्यासाठी पोलिसांनी सतर्कता का दाखविली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.