कारागृहात बनणार वाहन उपकरणे
By Admin | Published: October 3, 2016 02:49 AM2016-10-03T02:49:06+5:302016-10-03T02:49:06+5:30
मध्यवर्ती कारागृहातील कैदी फर्निचर, हँडलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ या व्यतिरिक्त काहीही तयार करू शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे.
योगेश पांडे / विशाल महाकाळकर ल्ल नागपूर
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी फर्निचर, हँडलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ या व्यतिरिक्त काहीही तयार करू शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु कारागृहातील कैदी आता हा समज मोडित काढणार आहेत. एकेकाळी गुन्ह्यांनी काळवंडलेले हात आता चक्क चारचाकी वाहनांसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती करताना दिसून येणार आहेत. नागपूर कारागृह प्रशासन व एका खासगी एजन्सीकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. तज्ज्ञांऐवजी कारागृहातील प्रशिक्षित कैदी उपकरणांचे उत्पादक बनणार असून यांची विक्री देशातील नामांकित वाहन कंपनीला करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैद्यांकडून वाहन उपकरणे तयार करवून घेणारे राज्यातील हे दुसरेच कारागृह ठरणार आहे हे विशेष.
अनेकदा क्षणिक रागापोटी हातून गुन्हा घडतो व कारागृहात कैद्याचे आयुष्य जगावे लागते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वत:ची उपजीविका भागविण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात आता यापुढचे पाऊल टाकले जाणार आहे. आता येथील कैदी कारागृहातच नामांकित वाहन कंपनीसाठी उपकरणे तयार करणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नागपूर : कैद्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच येथे ‘प्रोडक्शन युनिट’ सुरू करण्यात येणार आहे. पुण्याहून २ तज्ज्ञ सुमारे ३० कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. तांत्रिक पद्धतीचे हे प्रशिक्षण असून शिक्षित कैद्यांचा याकडे जास्त ओढा दिसून येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘वायरिंग हारनेस असेंब्ली’ या युनिटची कारागृहात सुरुवात करण्यात येईल. युनिटमध्ये प्रामुख्याने ‘वायरिंग’ तसेच ‘क्लच’ व ‘गेअर’साठी आवश्यक उपकरण तसेच सुट्या भागांची निर्मिती करण्यात येईल. या ‘युनिट’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून कैद्यांना एखाद्या कंपनीत काम केल्याचा अनुभव येणार आहे.
शिक्षित कैद्यांचा ओढा जास्त
नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नागपूर कारागृहात कैद्यांना कामाची कमतरता नाही. सुतार कामासंदर्भात तर कारागृहाकडे प्रचंड ‘आॅर्डर्स’ आहेत. परंतु अनेकदा शिक्षित कैद्यांना सुतार काम करणे आवडत नाही. वाहनांची उपकरणे बनविण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण लागते व त्याकरिता शिक्षण आवश्यक आहे.
त्यामुळे शिक्षित कैद्यांचा या नव्या कामाच्या प्रशिक्षणाकडे ओढा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. संबंधित कंपनीचे प्रशिक्षण पूर्ण झाले की ‘युनिट’मध्ये उत्पादन सुरू होईल. उत्पादनांचा दर्जा सर्वोत्तम असावा यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.(प्रतिनिधी)