नागपुरातील वाहन पार्किंग आता दुपटीने महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:03 AM2019-07-04T00:03:43+5:302019-07-04T00:05:16+5:30
महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किं ग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडून वाहन चालान होतात. यातून दिलासा मिळण्यासाठी मनपा बाजार विभागाकडून काही व्यापारपेठांमध्ये पार्किंग प्लाझांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत या पार्किंग स्थळांवर जुन्या दरानुसारच आकारणी व्हायची. मात्र आता याच ठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे भरावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किंग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडून वाहन चालान होतात. यातून दिलासा मिळण्यासाठी मनपा बाजार विभागाकडून काही व्यापारपेठांमध्ये पार्किंग प्लाझांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत या पार्किंग स्थळांवर जुन्या दरानुसारच आकारणी व्हायची. मात्र आता याच ठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे भरावे लागणार आहे.
मनपा पार्किंग धोरण-२०१६ अंतर्गत पार्किंगचे दर मनपाच्या बाजार विभागाने पार्किंग प्लाझामध्ये लागू केले आहेत. यानुसार, दुचाकी वाहनधारकांना पहिल्या एका तासासाठी १० रुपये, दोन तासांसाठी २० रुपये आणि चार तासांसाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत ही आकारणी फक्त १० रुपये होती. सायकल आणि हातठेल्यांच्या दराबद्दल काही निर्णय झालेला नाही. ऑटो रिक्षासाठी आतापर्यंत २० रुपयांची आकारणी होती. यापुढे एक तासासाठी १० रुपये, दोन तासांसाठी ३० रुपये आणि चार तासांसाठी ४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, कार-जीपकरिता एक तासासाठी ३० रुपये, दोन तासांसाठी ७० रुपये आणि चार तांसासाठी ८० रुपये आकारणी होणार आहे. आधी ही आकारणी २० रुपये होती. बस, मिनी बस आणि ट्रक-टेम्पोला एक, दोन आणि चार तासासाठी अनुक्रमे ५०, ११० आणि १४० रुपये दर ठरविण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
या प्रस्तावावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव तर्कसंगत नसल्याने यातून फारसे काही साध्य होणार नसल्याचे त्यांचे मत आहे. मनपाचे काम कमाई करण्याचे नसून नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे बैठकीतील चर्चेनंतर प्रस्तावित दरांमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे.
असे असतील पार्किंग निविदांचे नवे दर
प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग झोनच्या बडकस चौक पार्किंग प्लाझाच्या निविदेचे दर ६.२८ लाखांवरून ११.४२ लाख, धरमपेठ झोनच्या सुपर मार्केट पार्किंग स्टँडच्या निविदेचा दर १०.५६ लाखांवरून १९.२० लाख, धंतोली झोन अंतर्गत नवीन एसटी स्टँड, शेतकरी भवनामागील पार्किंगची निविदा ११.५५ लाखांवरून २१ लाख, तर धरमपेठ झोन अंतर्गत नेताजी मार्केट पार्किंगची निविदा ३.३२ लाखांवरून ६.०४ लाखांवर नेण्याचाही स्थायी समितीचा प्रस्ताव आहे.
मनपा कर्मचाऱ्यांनाही द्यावे लागणार शुल्क
मनपाचे कर्मचारी पार्किंगमध्ये नि:शुल्क वाहन पार्क करतात. मात्र यापुढे त्यांनाही शुल्क द्यावे लागणार आहे. सायकलसाठी ३० रुपये आणि स्कुटरसाठी ५० रुपये दरमहा द्यावे लागतील. त्यासाठी पास घ्यावा लागेल. या व्यतिरिक्त दररोज सायकलसाठी एक रुपया आणि स्कुटरसाठी दोन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.