अल्पवयीन मुलगा करायचा वाहनचोरी, मेकॅनिकसोबत रंग बदलून करायचा विक्री
By योगेश पांडे | Published: November 9, 2023 04:08 PM2023-11-09T16:08:58+5:302023-11-09T16:09:21+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पथकाची कारवाई
नागपूर : पार्किंगमधील वाहने चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा वाहने चोरी करून त्याच्या मेकॅनिक मित्राला द्यायचा. त्यानंतर रंग बदलून त्या वाहनांची विक्री करण्यात यायची. बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.
२ नोव्हेंबर रोजी सचिन मधुकर उईके (२८, बेसा डेअरी, बेलतरोडी) याची मोटारसायकल चोरी गेली. या प्रकरणात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक अल्पवयीन मुलगा चोरी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली.
त्याची सखोल चौकशी केली असता त्याने इतरही दुचाक्या चोरल्याचे सांगितले. ते त्याचा मेकॅनिक मित्र महेंद्र चरणदास राऊत (३२, वसंतनगर, अजनी) याच्या मदतीने वाहनाचा रंग बदलून त्यांची किंवा ॲसेसरिजची विक्री करायचा. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन , कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन अशी एकूण पाच वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज काकडे, राजेश घुगे, शैलेष बडोदकर, नंदकिशोर तायडे, अरुण सातपुते, सुहास शिंगणे, समेंद्र बोपचे, विवेक श्रीपाद यांच्या पथकाने ही कारवाई केली.