सीताबर्डीत कुठेही अन् कशीही केली जातात वाहने पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:40+5:302021-09-16T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून विख्यात असलेल्या सीताबर्डीत वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. येथे कपड्यांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून विख्यात असलेल्या सीताबर्डीत वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. येथे कपड्यांपासून ते मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, पादत्राणे, गृहसजावटीच्या वस्तू विक्रीची दुकाने, हॉटेल्स सगळेच आहेत. शहरातील २० ते ३० टक्के ग्राहकांच्या प्रथम पसंतीचा हा बाजार असल्याने, सीताबर्डी मार्केट परिसर कायम गजबजलेला असतो. सणोत्सवाच्या काळात तर येथे पायी चालणेही कठीण होऊन जाते, इतकी गर्दी येथे असते. त्यातच पार्किंगच्या समस्येने ही गर्दी आणखीनच नकोशी होत जाते. त्याचा फटका या परिसरात लोकवस्तीला बसतो. येथील गल्लीबोळात कुठेही आणि कशीही वाहने पार्क केली जात असल्याने, कुठूनही गेले आणि कुठूनही निघाले तरी ट्रॅफिकची समस्या कायम असते.
प्रवेश करताच, वाहन कुठे ठेवावे असा पडतो प्रश्न
लोहा पूल-मानस चौकापासून ते मेट्रोचे प्रमुख रेल्वे स्टेशन, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, फ्रीडम पार्क ते मानस चौक, अशी ही चौकट म्हणजे सीताबर्डी मार्केट परिसर होय. येथे प्रवेश करताच सर्वप्रथम प्रश्न पडतो, तो हा की वाहन पार्क कुठे करावे. म्हणायला अपना बाजार परिसरात पार्किंग स्थळ आहे आणि दुसरे मेट्रो स्टेशन येथे आहे. त्यातच नव्याने तयार झालेल्या ग्लोबल प्लाझा इमारतीतही पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र, वाहन पार्क केल्यावर फार लांब जावे लागत असल्याने, नागरिक जिथे मिळेल तिथे आणि कशाही तऱ्हेने वाहन पार्क करतात.
लोहापूल ते मेट्रो स्टेशनपर्यंत होते ट्रॅफिक जॅम
अतिव्यस्त परिसर असल्याने येथे ट्रॅफिक जॅम होणे म्हणजे नवल नाही. मात्र, लोहापूल, शनिमंदिर परिसरातील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये येणारी गर्दी आणि तेथपासून पुढे मेट्रो स्टेशनपर्यंत अस्तव्यस्त अवैध पार्किंगमुळे ट्रॅफिक जॅम होण्याची समस्या जास्त असते. ही व्यवस्था पाहणारी प्रशासकीय ट्रॅफिक यंत्रणा थातूरमातूर टेहळणी करते. कारवाई होण्याची भीती इथे कुणालाच नसते.
* मोदी नंबर - सीताबर्डी येथील मोदी नंबर १, २ या गल्ल्या व्यावसायिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या गल्ल्यांमध्येच हॉटेल्स, लॉज, कापडांची दुकाने, हॉटेल्स आहे. अतिशय निमुळत्या असलेल्या या गल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. त्यामुळे, येथून जाणे तारेवरची कसरत ठरते.
* फेरीवाले - सीताबर्डीमध्ये स्थायी दुकाने असण्यासोबतच फुटपाथवर दुकाने थाटून उपजीविका चालविणारे अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळेही, येथे नेहमी ट्रॅफिक जॅम होते.
* ऑटोवाले - ऑटोचालकांसाठी विशेष पार्किंग स्थळ असले तरी प्रवाशांची शोधाशोध करताना ते कुठेही थांबतात. बरेचदा तेथेच ऑटो पार्क करून ग्राहकांची शोधाशोध सुरू असते.
.............