कस्तूरचंद पार्क परिसरात वाहनांना बंदी
By admin | Published: April 10, 2016 03:14 AM2016-04-10T03:14:21+5:302016-04-10T03:14:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे वर्षभर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सोनिया व राहुल गांधी यांची उद्या सभा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे वर्षभर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचा समारोप सोमवारी नागपुरातील कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह देशभरातील नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून कस्तूरचंद पार्कपासून ५०० मीटर अंतरापर्यंत वाहनांचा बंदी घालण्यात आली आहे. विविध वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बसेस पार्किंगची व्यवस्था
वर्धा रोडकडून येणाऱ्या बसेससाठी आयटीआय, माताकचेरी चौकाजवळ, मॉरिस कॉलेज ग्राऊंड धंतोली, एअरपोर्ट वायरलेस स्टेशन कोकाकोला चौक, इंडियन जिमखाना धंतोली, दीनानाथ हायस्कूल धंतोली, होमगार्ड कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूल काँग्रेसनगर, सांस्कृतिक बचत भवन आनंद टॉकीज, स्नेहनगर जॉगिंग पार्क, कोका कोला आठवडी बाजार, अमरावती रोडकडून येणाऱ्या बसेससाठी रविनगर शासकीय वसाहत मैदान, देशपांडे सभागृह, हिस्लॉप कॉलेज, पोलीस लॉन, रामगिरी हेलिपॅड. कोराडी रोडकडून येणाऱ्या बसेससाठी क्रीडा संकुल मानकापूर. भंडारा रोडकडून येणाऱ्या सरदार पटेल कच्छीविसा मैदान लकडगंज. उमरेड रोडकडून येणाऱ्या बसेससाठी शितला माता मंदिर, भविष्य निर्वाह निधी, उमरेड रोड, मोठा ताजबाग, उमरेड रोड, दिघोरी टोल नाका.कामठी रोडकडून येणाऱ्या बसेससाठी आयटीआय मैदान जरीपटका येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कस्तूरचंद पार्कजवळील रस्त्यांवरील सर्व वाहनांना बंदी
सोमवार ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून लिबर्टी ते एलआयसी चौक, पाटणी आॅटोमोबाईल चौक ते एलआयसी, कन्नमवार पुतळा चौक ते संविधान चौक, झिरो माईल ते संविधान चौक, जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील.
कार व दुचाकी वाहन
बिशप कॉटन स्कूल समोरील मैदान, सदर, विदर्भ हॉकी ग्राऊंड तिरपुडे कॉलेज, सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च, सेंट जॉन स्कूल मोहननगर, आॅल सेंट हाऊस चर्च, सेंट उर्सुला मैदान, एसएफएस स्कूल, सरपंच भवन , तिरपुडे कॉलेज, जिल्हा परिषद कन्या शाळा, काटोल रोड, अंजुमन कॉलेज, वाडी दर्गा मैदान, गरोबा मैदान धावडे मोहल्ला.
सभेसाठी कॉंग्रेसची ‘कंट्रोल रूम’
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे मोठे आव्हान पक्षनेत्यांसमोर आहे. या सभेतून केंद्रातील सरकार हादरले पाहिजे यासाठी केंद्रीय कॉंग्रेस समितीकडूनदेखील विशेष लक्ष घालण्यात येत आहे. या सभेच्या नियोजनासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार विशेष ‘कंट्रोल रूम’ उभारण्यात आली आहे. धनवटे नॅशनल कॉलेज येथे उभारण्यात आलेल्या या ‘कंट्रोल रूम’मधून राज्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. सोबतच या सभेसाठी देशभरातून शेकडो नेते येणार आहेत. त्यांची त्याचप्रमाणे प्रसिद्धीमाध्यमांची व्यवस्था, सभेची वातावरणनिर्मिती याचे एकूण नियोजन याच ‘कंट्रोल रूम’मधून होत आहे. अभिजित देशमुख, डॉ.बबन तायवाडे, तौफिक मुल्लानी यांच्याकडे या ‘कंट्रोल रूम’ची जबाबदारी देण्यात आली आहे.
एसपीजीने केली दीक्षाभूमीची पाहणी
काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी ११ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा पथकाने (एसपीजी) शनिवारी दीक्षाभूमीची पाहणी केली. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसपीजीने शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. त्या दीक्षाभूमी परिसरात कुठे कुठे जाणार आहेत, त्या जागेची पाहणी केली. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीसुद्धा दीक्षाभूमीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे व सुधीर फुलझेले यांच्यासह आ. शरद रणपिसे, भाई जगताप आदी काँग्रेस नेते होते.