ओडिशात २० कोळसा खाणी सुरू करणार वेकोलि
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:15 AM2020-12-22T11:15:13+5:302020-12-22T11:15:49+5:30
Nagpur News वेकोलि १७ हजार करोड रुपयांच्या गुंतवणुकीसोबत ओडिशात २० नव्या कोळसा खाणी सुरू करणार असल्याची माहिती वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेकोलि १७ हजार करोड रुपयांच्या गुंतवणुकीसोबत ओडिशात २० नव्या कोळसा खाणी सुरू करणार असल्याची माहिती डिसेंबर अखेर सेवानिवृत्त होत असलेले वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी दिली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी सिव्हील लाईन्स येथील नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित मिट द प्रेस उपक्रमात ते बोलत होते. यावेळी वेकोलिचे भावी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार उपस्थित होते. मिश्र म्हणाले, ओडिशा मायनिंग कॉपोर्रेशन लिमिटेडसोबत संयुक्त करार करण्यात येईल. त्यानंतर नव्या वित्त वषार्पासून खाणींचे काम सुरू होऊन वर्ष २०२२ पासून कोळसा उत्पादन सुरु होईल. वेकोलिने वर्ष २०२३-२४ साठी ७५ मेट्रिक टन आणि वर्ष २०२४-२५ साठी १०० मेट्रिक टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वर्ष २०१९-२० मध्ये वेकोलिने लक्ष्यापेक्षा १०३ टक्के अधिक म्हणजे ५७.६४ मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन केले होते. यावेळी मिश्र यांनी सांगितले की त्यांच्या कार्यकाळात आर्थिक संकटात असलेल्या वेकोलिला आयसीयूमधून बाहेर काढण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्यात आले. नव्या कोळसा खाणी सुरू करण्यात आल्या. त्यामुळे उत्पादनासोबत कंपनीचे उत्पन्न वाढू लागले आहे. त्याचे श्रेय वेकोलिच्या टीमला जाते. भद्रावतीमध्ये प्रस्तावित कोळशावर आधारित युरिया प्लान्टसाठी वेकोलि कोळसा देण्यास तयार आहे. कोणी पुढे येऊन प्रकल्प उभारल्यास चांगले होईल. पुढील ४० वर्षापर्यंत कोळशाची मागणी होणारच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोल माईनमध्ये तयार होणार मिथेनॉल
मिश्र यांनी सांगितले की चंद्रपूरच्या दुर्गापूर आणि बटाडी या दोन कोळसा खाणीत सरफेस गॅसिफिकेशनच्या माध्यमातून मिथेनॉल तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अभिनव प्रयोगाचा अहवाल सकारात्मक आला आहे. सर्व काही ठीक राहिल्यास या खाणीत मिथेनॉल तयार करण्यात येईल. कोरोनाच्या काळात वेकोलिने मिशन मोडमध्ये काम केले. यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथून ३० मेट्रिक टन कोळशाची मागणी आली. त्यास रेल्वेने पाठविण्यासाठी ५० दिवसात ५० रॅकची व्यवस्था करण्यात आली. यामुळे २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीत वेकोलिने २३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. तिसऱ्या तिमाही आणि संपूर्ण वित्त वर्षात कंपनीचे चांगले प्रदर्शन राहण्याची अपेक्षा आहे.
वेकोलिला नव्या उंचीवर नेणार
वेकोलिचे भावी व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार आपली प्राथमिकता सांगताना म्हणाले, माज्या कार्यकाळात मी वेकोलिला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ओडिशात कोळसा खाणी सुरू करून कोळशाचे उत्पादन १०० मेट्रिक टनपर्यंत नेण्यात येईल. अंडरग्राऊंड खाणींच्या पुनरुद्धारासाठी त्यांच्या मॅकेनायझेशनवर भर देण्यात येईल. कोळशाच्या गुणवत्तेवर भर देण्यात येईल. मार्केटिगच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर, सायडिंग विकसीत करण्यात येतील. कोळसा खाणीत अपघात कमी करण्यावर लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.