वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:56+5:302021-06-03T04:07:56+5:30

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास ...

Vekoli's indifference, Amandi's breath caught | वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

Next

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास कोंडतो आहे. कोळसा खदानीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायने आणि नदीपात्रात वाढलेल्या काटेरी-झुडपांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत वेकोलिने केराची टोपलीच दाखविली असून लोकप्रतिनिधींकडेसुद्धा समस्या मांडूनही कवडीचा उपयोग झाला नाही, असा संताप शेतकऱ्यांचा आहे.

उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या वेकोलि पुलापासून ते कोटगाव पुलापर्यंतच्या ३ किलोमीटर परिसरात ही समस्या भेडसावत आहे. उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नदीकिनारी आहेत. नदीपात्रात गाळ, झाडेझुडपे यांची बेसुमार वाढ झाल्यामुळे आमनदीच्या पुराच्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. नदीचे पात्र उथळ झाले आहे. यामुळे पावसाळ्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेने न जाता अनेक ठिकाणी थांबतो. शिवाय कोळसा खदानीच्या तेलमिश्रित रासायनिक तवंग पाण्यावर दिसून येतात. पाणी थोपल्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहते. पिके सतत पाण्याखाली राहत असल्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यावर्षी सुद्धा पावसाळा तोंडावर आहे. अद्याप वेकोलिने कोणतेही पाऊल उचलले नाही. मागील अनेक वर्षांपासून ही बाब शेतकरी वेकोलिच्या अधिकाऱ्यांजवळ मांडत आहेत. अनेकदा निवेदने, चर्चा करूनही वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. वेकोलिने तातडीने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधींनी योग्य भूमिका पार पाडावी, अशी मागणी अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, दिलीप पोंगडे, उमेश कटरे, श्याम गिरडकर, राहुल गिरडकर, सुनील चिचमलकर, डोमाजी लांबट, माला भुसारी, श्रीराम मेंढुले, सुजित भुजाडे, मंगेश कुर्जेकर, राजू बंड, प्रकाश पोंगडे, सुनील चौधरी, अशोक चौधरी, प्रकाश पोंगडे, शंकर गिरडकर, ईश्वर कुर्जेकर, सुरज चाफले आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून वेकोलिच्या निष्काळजीपणाचा फटका बसत असल्याचा आरोपही केला आहे.

निसर्गाशी दोन हात

एक नव्हे अनेकदा नैसर्गिक आमनदीचे वळण वेकोलिने वळविले. कोळसा उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी आणि खदानीचे आयुष्य वाढविण्यासाठी वेकोलिने करोडो रुपयांचा निधी ओतून निसर्गाशी दोन हात केले. आमनदीचे वळणकाम झाल्यानंतर वेकोलिने नदीकडे दुर्लक्ष केले. आमनदी शिरपूर-कान्हवा पासूनच्या वळणावरच जाम झाली. नदीपात्रातच गाळ, झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आमनदीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला.

--

मागील पाच ते सात वर्षांपासून सोयाबीन, धान, कापूस आदी पिकांमध्ये आमनदीच्या पात्रातील पाणी शेतात साचते. यामुळे पिके सडतात. अतोनात खर्च करूनही दरवर्षी आमचे नुकसान होत आहे. तातडीने नदीचा उपसा करावा. विपरीत परिस्थितीत वेकोलिने शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही.

अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, शेतकरी.

-

Web Title: Vekoli's indifference, Amandi's breath caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.