लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्याने रेल्वेगाड्यात वाढले व्हेंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:22+5:302021-05-18T04:07:22+5:30
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकत असून रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली ...
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकत असून रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यात रेल्वे सुरक्षा दल, वाणिज्य विभाग आणि आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन)च्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत ३२ अवैध व्हेंडरवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आपली उपजीविका भागविण्यासाठी अनेकांनी रेल्वेत खाद्यपदार्थ विकण्याचा पर्याय शोधून काढला आहे. आऊटरकडील भागातून ते रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ घेऊन चढतात. त्यानंतर प्रवाशांना ते खाद्यपदार्थ विकतात. याची माहिती रेल्वे सुरक्षा दल, वाणिज्य विभाग आणि आयआरसीटीसीला मिळाली. त्यांनी संयुक्तरीत्या अभियान राबवून ३२ अवैध व्हेंडरला अटक केली. यात पेंट्रीकारमधील सहा कामगारांवरही कारवाई करण्यात आली. आयआरसीटीसीच्या यादीत नसलेले खाद्यपदार्थ विकताना ते आढळले. सर्व अवैध व्हेंडरविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४४, १३७ आणि १४७ नुसार गुन्हा दाखल केला. सध्या रेल्वे न्यायालयाचे कामकाज बंद असल्यामुळे पकडलेल्या अवैध व्हेंडरला जामिनावर सोडण्यात आले. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
............