मुरुम तस्करांना दणका; अवैध उत्खननप्रकरणी व्यंकटा रमनाई कंपनीला १६ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:02 AM2022-04-27T11:02:08+5:302022-04-27T11:05:11+5:30

नागपूर येथील श्री.पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीला १५ कोटी ८७ लाख १२ हजार रुपयांचा दंड उमरेड व कुही येथील महसूल विभागाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.

Venkata Ramana Company of nagpur fined Rs 16 crore for illegal sand mining | मुरुम तस्करांना दणका; अवैध उत्खननप्रकरणी व्यंकटा रमनाई कंपनीला १६ कोटींचा दंड

मुरुम तस्करांना दणका; अवैध उत्खननप्रकरणी व्यंकटा रमनाई कंपनीला १६ कोटींचा दंड

Next
ठळक मुद्देउमरेड आणि कुही महसूल विभागाची कारवाई

उमरेड/ कुही (नागपूर) : जिल्हा परिषद लघुसिंचन गाव तलाव, लघू पाटबंधारे उपविभाग अंतर्गत येणारा मालगुजारी तलाव आणि एका शेतकऱ्याच्या शेतातून विनापरवाना अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या नागपूर येथील श्री.पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीला १५ कोटी ८७ लाख १२ हजार रुपयांचा दंड उमरेड व कुही येथील महसूल विभागाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.

श्री. पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील पाझर तलावातून मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद लघुसिंचन कार्यालयाची रीतसर परवानगी घेतली गेली नाही.

महसूल विभागात उत्खनन करण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टीसुद्धा भरली नाही. येथे अवैधरीत्या उत्खनन केल्याचे निदर्शनास आले, अशी बाब आदेश पत्रात नमूद आहे.

सोनपुरी येथील पाझर तलावातून १४,७५६ घनमीटर (४,९१८ ब्रास) अवैधरीत्या मुरुमाची उचल करण्यात आल्याचे मोजमापावरून स्पष्ट झाले आहे. सध्या तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे व मजबुतीकरणाचे कोणतेही काम सुरू नाही. कोणत्याही यंत्रणेला परवानगी दिली नाही. तसेच संबंधित यंत्रणेने केलेले खोदकाम धोकादायक असल्याचीही नोंद महसूल विभागाने घेतली आहे. ४,९१८ ब्रासकरिता एकूण ३ कोटी ४४ लाख २६,००० रुपयांचा दंड या कारवाईत आकारला गेला आहे.

कुही तालुक्यातील भोजापूर येथेसुद्धा एका शेतकऱ्याच्या शेतातून अशाच पद्धतीने अवैधरीत्या विना रॉयल्टी मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी या कंपनीला ६ कोटी ३८ लाख ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एकूण ८,३२२ ब्रासकरिता हा दंड कुही तहसीलदार यांनी ठोठावला.

याच कंपनीने उमरेड तालुक्यातील बाम्हणी येथील सर्व्हे क्रमांक ४११ येथील मालगुजारी तलावातून सुद्धा चोरटा प्रकार केला. ७.१० हेक्टर परिसरात अवैध मुरूम उत्खनन केल्याची बाब उजेडात आली. बाम्हणी येथे ८,६४० ब्रासकरिता ६ कोटी ४ लाख ८० हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत.

दंडाची रक्कम भरा

तिन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी गैरअर्जदार श्री. पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीने दंडाची रक्कम तत्काळ भरावी, अन्यथा जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसुलीची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

गुन्हा दाखल होणार कधी?

अवैधरीत्या उचल केलेल्या मुरुमाची चोरी केल्याचेही आदेशात नमूद आहे. विनापरवानगी उत्खनन करणे, रॉयल्टी अदा न करणे सोबतच अवैधरीत्या उचल केलेल्या मुरुमाची चोरी केल्याचीही बाब आदेशात नमूद आहे. चोरीचाही गुन्हा सदर कंपनीच्या वतीने करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा सोनपुरी येथील तक्रारकर्ते राहुल तागडे यांनी केली आहे.

कंत्राटदाराची धावाधाव

कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशा तोऱ्यात असलेल्या कंत्राटदारावर चौफेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लगेच ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी कंत्राटदाराने बडे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे धाव घेतली. सध्या आंध्र प्रदेशातून संबंधित कंत्राटदाराची धावाधाव सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केलेली आहे. दंड न भरल्यास नियमाप्रमाणे वसुली करू. अवैधरीत्या उत्खनन करणे हा गुन्हा आहे. कुणाचीही हयगय केली जाणार नाही.

चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी, उमरेड

Web Title: Venkata Ramana Company of nagpur fined Rs 16 crore for illegal sand mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.