अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्मवर निघाला विषारी साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:41 AM2021-07-21T00:41:51+5:302021-07-21T00:42:19+5:30
venomous snake अजनी रेल्वे स्टेशनवरील क्रमांक दोनच्या प्लॅटफार्मवर सोमवारी सायंकाळी निघालेल्या विषारी सापाने सर्व प्रवाशांची त्रेधातिरपिट उडवून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वे स्टेशनवरील क्रमांक दोनच्या प्लॅटफार्मवर सोमवारी सायंकाळी निघालेल्या विषारी सापाने सर्व प्रवाशांची त्रेधातिरपिट उडवून दिली. मात्र सर्पमित्र श्रीकांत उके यांनी तातडीने धाव घेऊन सापाला पकडले, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला. सुमारे २० मिनिटे हा प्रकार प्रवाशांनी अनुभवला.
सोमवारी सायंकाळी ८.२० वाजता अजनी स्टेशनवर हावडा-अहमदाबाद रेल्वे पोहचली होती. प्रवाशांचीही धावपळ सुरू होती. रेल्वे पोहचल्याने प्रवासी डब्यात चढण्यासाठी धडपडत होते. एवढ्यात या रेल्वेच्या एस-११ या बोगीसमोर एक साप वळवळत असल्याचे काही प्रवाश्यांना दिसले. त्यामुळे एकच धापवळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच स्टेशन मॅनेजर माधुरी चौधरी यांनी लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल श्रीकांत उके यांना कळविले. ते सर्पमित्रही आहेत. त्यांनी तातडीने स्टेशनकडे धाव घेतली. या वेळीही साप बोगीसमोरच होता. प्रवाशांचीही गर्दी होती. त्यांनी मुकुंद जोशी यांच्याशी संपर्क साधून हा साप पकडला व निसर्गमुक्त केले. सुमारे साडेतीन फूट लांबीचा हा विषारी साप डुरक्या घोणस जातीचा होता. उके हे लोहमार्ग पोलिसात कार्यरत असून सापांचे अभ्यासकही आहेत. त्यांनी सापांवरील अनेक प्रबंधही सादर केले आहेत.