टेलिस्कोपने घडविले शुक्र, मंगळ, शनि अन् गुरुचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:47 AM2018-10-05T10:47:39+5:302018-10-05T10:51:05+5:30
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्र हा ग्रह सूर्याच्या अतिशय जवळचा ग्रह असून त्याचे तापमान ४८० डिग्री सेल्सियस राहते, मंगळावर २५ किलोमीटर उंचीचा म्हणजे एव्हरेस्टपेक्षा चौपट उंच पहाड आहे, गुरु हा ग्रह १३ लाख पृथ्यीच्या क्षमतेएवढा आहे अन् शनी या ग्रहावर खूप अधिक गॅस आहेत, अशी चित्तथरारक माहिती जाणून नागरिक थक्क झाले. माहिती दिल्यानंतर नागरिकांना रमण विज्ञान केंद्रात टेलिस्कोपच्या साहाय्याने या चार ग्रहांचे दर्शनही घडविण्यात आले.
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात. हा दुर्मिळ योग असून हे ग्रह वर्षभरात कधी एका रांगेत येत नसल्याची माहिती रमण विज्ञान केंद्राचे विलास चौधरी यांनी दिली. यावेळी आॅडिटोरियममध्ये नागरिकांना वरील चारही ग्रहांची माहिती तांत्रिक अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली. ते म्हणाले, शुक्र हा चंद्रानंतर लकाकणारा दुसरा ग्रह आहे. याला प्रेमाची देवता असेही म्हणतात. या ग्रहावरील तापमान नेहमी ४८० डिग्री सेल्सियस राहते. येथील वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रस आॅक्साईड हे वायू असतात. हे वायू तापमानाला धरून ठेवण्याचे काम करतात. स्वत: भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी या ग्रहाला २४३ दिवस लागतात. पृथ्वीवरील आणि शुक्रावरील बहुतांश बाबीत साम्य असते. या ग्रहावर अॅसिडचा पाऊस पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मंगळ (मास) या ग्रहावरीलही बहुतांश बाबी पृथ्वीसारख्याच आहेत. येथे पाणी आढळत नाही तर जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तेथे पाणी बर्फाच्या रुपात आढळते. या ग्रहावर मॉन्स ओलंपस या नावाचा २५ किलोमीटर उंचीचा पहाड आहे. या ग्रहाचे तापमान पृथ्वीएवढे असल्याचे त्यांनी सांगितले. रमण विज्ञान केंद्रात १२ आॅक्टोबरपर्यंत स्पेस विक साजरा करण्यात येत असून नागरिकांना या चारही ग्रहांबद्दल माहिती देऊन त्यांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
गुरुवर सामावतात १३ लाख पृथ्वी
सामान्यपणे पृथ्वी ही फार मोठी आहे असे आपल्याला वाटते. परंतु गुरु या ग्रहावर १३ लाख पृथ्वी सामावू शकतात, अशी माहिती महेंद्र वाघ यांनी देताच उपस्थित नागरिक थक्क झाले. ते म्हणाले, गुरुवर माणसाचे वजन पृथ्वीवरील वजनाच्या तिप्पट होते. तो सूर्याकडून ूऊर्जा घेतो. अलीकडे ३०० वर्षापासून या ग्रहावर लाल रंगाचा डाग आढळत आहे. शनि हा ग्रह पृथ्वीपेक्षा ९० पट मोठा असून भविष्यात या ग्रहावर जीव उत्पत्ती होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी लुटला ग्रह पाहण्याचा आनंद
आॅडिटोरीयममध्ये शुक्र, गुरु, शनि आणि मंगळ या ग्रहांची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यानंतर नागरिकांनी रमण विज्ञान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ हे ग्रह पाहण्याचा आनंद लुटला. मोठ्या आकाराचे टेलिस्कोप रमण विज्ञान केंद्राने हे ग्रह पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. ग्रह दर्शनानंतर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी उत्तरे देण्यात आली.