शिवभोजनाच्या नवीन केंद्रांचे झाले व्हेरिफिकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:07+5:302021-05-07T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संकटाच्या काळात गरीब, गरजूंना नवीन केंद्रातून लवकरच शिवभोजन मिळणे सुरू होईल. नवीन केंद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाच्या काळात गरीब, गरजूंना नवीन केंद्रातून लवकरच शिवभोजन मिळणे सुरू होईल. नवीन केंद्र सुरु करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते.
दुसऱ्याच दिवशी त्याचा परिणाम दिसून आला. गुरुवारी पाच नवीन शिवभोजन केंद्रांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. येत्या दोन दिवसात वर्कऑर्डर मिळणार असून, प्रत्यक्ष भोजन वाटप सुरु होणार असल्याचे सांगितले जाते.
कोरोनाच्या या संकटात लोकांच्या कमाईवर परिणाम पडला आहे. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही अनेकांसाठी कठीण होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पार्सलद्वारे मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली होती. परंतु अधिकारी संथ गतीनेच काम करीत होते. नागपूरसाठी २० नवीन शिवभोजन केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी सध्या पाच केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
लोकमतच्या वृत्तानंतर गुरुवारी सकाळी नवीन केंद्रांवर अन्न व पुरवठा विभागाच्या निरीक्षकांसह पथक पोहोचले. केंद्राचे निरीक्षण करून व्हेरिफिकेशन करण्यात आले.
सुत्रानुसार फूड इन्स्पेक्टरने नवीन केंद्र संचालकांना दोन दिवसात भोजन वितरण सुरू करण्यास सांगितले आहे. यामुळे या केंद्रांना येत्या दोन दिवसात कार्यादेश जारी होण्याची शक्यता आहे. नागपुरात सध्या १० केंद्रांवरून शिवभोजन दिले जात आहे. नवीन २० केंद्रांनाही मंजुरी मिळाली तर एकूण ३० शिवभोजन केंद्र होतील. प्रत्येक केंद्रावरून १०० लाभार्थ्यांना पार्सलद्वारे शिवभोजन दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
बाॅक्स
कार्यालयात अधिकारी दिसेना
सिव्हील लाईन्स येथील अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात सध्या अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्यासारखी आहे. दोन अधिकारी प्रकृतीच्या कारणामुळे सुटीवर आहेत. या आपत्तीच्या काळात भोजन व रेशनशी संबंधित कामाला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. परंतु यासंदर्भात अधिकारी स्पष्टपणे काही न सांगता मौन साधून आहेत. त्यामुळे उर्वरित १५ केंद्र कधी सुरु होणार हे स्पष्ट होऊ शकले नाही.