सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम संपले
By admin | Published: March 12, 2016 03:18 AM2016-03-12T03:18:29+5:302016-03-12T03:18:29+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीच्या कामाची गाडी अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे.
नागपूर विद्यापीठ : आता आव्हान ‘सेवार्थ’ च्या तांत्रिक प्रक्रियेचे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीच्या कामाची गाडी अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. ११ दिवसांच्या कालावधीत नागपूर विद्यापीठ व उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण केले. पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता पदांच्या पडताळणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. ‘सेवार्थ’चे काम अनेक दिवसांपासून अडकले असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठातील ९९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सामान्य निधीतूनच होत आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार सेवार्थ प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार उच्च शिक्षण सहसंचालकांनी मागवलेली कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती कागदपत्रांसह विद्यापीठाने कळविणे अपेक्षित होते. यात अगदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासूनच्या सखोल माहितीचा समावेश होता. परंतु ही माहिती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची तपासणी पूर्ण झालीच नव्हती. कर्मचारी संख्या मोठी असल्यामुळे संबंधित काम पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
विद्यापीठाचे ‘सेवार्थ’चे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर व कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी चर्चा केली. संबंधित माहिती भरणे व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे यासाठी विद्यापीठातील कर्मचारी तसेच उच्चशिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे काम करतील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर ११ दिवसांच्या कालावधीत सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण करण्यात आले. विद्यापीठात तसेच सहसंचालक कार्यालयातील सुमारे ३० कर्मचारी-अधिकारी यांनी सातत्याने हे काम केले. (प्रतिनिधी)