मेट्रोच्या पिलरवर व्हर्टिकल गार्डन
By Admin | Published: April 13, 2017 03:03 AM2017-04-13T03:03:25+5:302017-04-13T03:03:25+5:30
नागपूरच्या सौंदर्यात भर टाकणारे व्हर्टिकल गार्डन मेट्रो रेल्वेच्या चार पिलरवर तयार करण्यात येत आहे.
तापमान कमी होण्यास मदत : हवेतील कार्बन डायआॅक्साईड कमी होणार
मोरेश्वर मानापुरे नागपूर
नागपूरच्या सौंदर्यात भर टाकणारे व्हर्टिकल गार्डन मेट्रो रेल्वेच्या चार पिलरवर तयार करण्यात येत आहे. या प्रायोगिक प्रकल्पाचे काम वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडसमोरील पिलरवर सुरू असून दोन पिलरवर गार्डन तयार झाले आहे. यामुळे नागपूरचे तापमान काही प्रमाणात निश्चितच कमी होणार आहे. शिवाय, वर्धा मार्गावरून नागपुरात येणाऱ्या लोकांना व्हर्टिकल गार्डन आकर्षित करीत आहेत.
एका पिलरवर तीन हजार झाडे
पिलरच्या चारही बाजूला युफोरबिया, फालफिजिया, यूका, सेन्सीव्हेरा, निरीयम, थूजा, खुफिया आदी प्रकारची शोभिवंत झाडे लावली आहेत. सर्व झाडे पुणे येथील ए-वन बायोटेक कंपनीकडून मागविली आहेत. सर्व झाडे आॅक्सिजन देणारी, कमी देखभाल आणि नागपूरच्या हवामानारूप आहेत. एका पिलरवर तीन हजार झाडे लावली असून एक झाडाला दिवसाला साधारत: ६० मि.लि. पाणी लागते. झाडांना पुनर्प्रक्रिया केलेले पाणी ठिंबक पद्धतीने देण्यात येते. सध्या चार पिलरचा आॅर्डर मिळाला आहे. दोन पिलरवर गार्डन पूर्ण झाले आहे, तर अन्य दोन गार्डन महिन्यात पूर्ण होईल. गार्डनची देखभाल कंपनीतर्फे करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
होऊ शकतो बदल
प्रायोगिक प्रकल्पात काही नवीन गोष्टींचा समावेश होऊ शकतो. कमीत कमी खर्चात गार्डन कसे तयार होईल, यावरही मेट्रो रेल्वेचे अधिकारी विचार करू शकतात. कोरोना ग्रीन्सने बेंगळुरु येथे दोन माळ्याच्या इमारतीत सजावट लाईफ ग्रीन झाडे केवळ ४८ तासात लावली आहेत.जाधव म्हणाले, गार्डन निर्मितीसाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित आणि अन्य अधिकारी सहकार्य करीत आहेत. बुधवारी सकाळी दीक्षित यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हर्टिकल गार्डनची पाहणी करून प्रशंसा केली. मेट्रो रेल्वे प्रकल्पात जवळपास १२०० पिलर उभे राहतील. व्हर्टिकल गार्डन किती पिलरवर तयार होईल, हे मेट्रोचे अधिकारी ठरविणार आहेत.
असे तयार होते व्हर्टिकल गार्डन
कोरोना ग्रीन्सचे प्रमुख रोहित जाधव यांनी सांगितले की, व्हर्टिकल गार्डन ३० फूट लांब आणि जवळपास पिलरच्या ६०० चौरस फूट जागेत तयार करण्यात आले आहे. पिलरची सजावट उच्च दर्जाच्या पेंटने केली आहे. पिलरपासून एक इंच लांब अंतरावर उन्हापासून बचाव करणाऱ्या आणि न सडणाऱ्या फायबर फे्रम पिलरच्या चारही बाजूला लावल्या आहेत. सर्व फे्रम खास करून पिलरकरिता तयार करण्यात आल्या आहेत. फे्रम टिकाऊ आणि शक्तिशाली असून आयुष्यभराची गॅरंटी आहे. त्यात लावण्यात आलेल्या फेल्ट (जिओ फॅब्रिक्स) सिस्टीममध्ये शोभिवंत झाडे लावली आहेत. जिओ फॅब्रिक्स अर्थात कापड आर्द्रता धरून ठेवते. त्यामुळे पाण्याची बचत होते. याशिवाय गार्डन तयार झाल्यानंतर पिलरला इजा होत नाही, शिवाय पेंट खराब होत नाही. एका पिलरवर व्हर्टिकल गार्डन तयार करण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतात, असे जाधव यांनी सांगितले.