नागपुरातील दिघोरी परिसरात आढळला अति दुर्मिळ अल्बीनो तस्कर साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:34 PM2020-12-03T14:34:10+5:302020-12-03T14:34:28+5:30
Nagpur News snake बुधवारी भल्या पहाटे साई नगर दिघोरी नागपूर निवासी राघोर्ते यांच्या घराच्या अंगणात आढळला अति दुर्मिळ अल्बीनो तस्कर साप.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बुधवारी भल्या पहाटे साई नगर दिघोरी नागपूर निवासी राघोर्ते यांच्या घराच्या अंगणात पांढरा शुभ्र १ फूट लांबीचा साप दिसला. व पाहता पाहता तो तुळशी वृदांवनाच्या खालच्या भागातील काँक्रीटच्या खाली शिरला. पांढऱ्या रंगाचा साप दिसल्यामुळे घरच्यांना आश्चर्यचा धक्काच बसला. ह्या सापाला सुखरूप पकडण्यात यावे म्हणून सर्पमित्र अभिषेक देवगिरीकर, प्रतीक वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सर्पमित्रांनी काही वेळातच घटनास्थळ गाठले व एक तासाच्या श्रमानानंतर सापाला रेस्क्यू करण्यात यश मिळाले. ह्या पांढऱ्या रंगाच्या सापाविषयी नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे सर्पमित्रांनी निराकरण केले.
तस्कर सापाला इंग्रजीमध्ये "Trinket snake" म्हणतात. हा बिनविषारी असून नागपूरमध्ये सर्वत्र आढळतो. अल्बीनो तस्कर साप अत्यंत दुर्मिळ असून दिसायला अति सुंदर पांढऱ्या रंगाचा असतो व डोळे लाल-गुलाबी असतात. अल्बीनो तस्कर साप ही वेगळी जात नसून सापाच्या डी.एन.ए मध्ये विशेष बदल झाल्याने सापाची त्वचा पांढरी पडत असते. सापाच्या शरीरातील मेलॅनिन प्रमाण कमी झाल्याने सापाच्या त्वचेचा रंग हळूहळू फिक्कट पडत जातो व पुढे सापाची त्वचा पांढरी होत जाते. अल्बीनिझम ही अनुवांशिक घटना असते, जन्म होण्याच्या वेळी सापाच्या अंड्याना मिळणारी ऊब तसेच वातावरणातील बदलांमुळे अंड्यातील सापांमध्ये रंगद्रव्याचा अभाव होतो त्यामूळे सापाची त्वचा पांढरी होते. अल्बीनो साप त्याच्या रंगामुळे आकर्षणाचा विषय बनतो.
ह्या सापाला आवश्यक अशा अनुकुल वातावरणाचा विचार करून निसर्गात मुक्त केले गेले.