ज्येष्ठ रंगकर्मी मराठी नाट्यदिग्दर्शक मदन गडकरी यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:26 AM2022-12-20T10:26:29+5:302022-12-20T12:18:41+5:30
Nagpur News ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी यांचे मध्यरात्री निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. विदर्भातील हौशी रंगभूमीला उर्जितावस्था देणाऱ्यांपैकी ते एक होते.
नागपूर : ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी यांचे मध्यरात्री निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.
विदर्भातील हौशी रंगभूमीला उर्जितावस्था देणाऱ्यांपैकी ते एक होते.
मदन गडकरी यांची नाट्य कारकीर्द धनवटे नॅशनल काॅलेजच्या स्नेहसंमेलनातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकापासून सुरु झाली. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ' पै,पै आणि पै' या फार्सला नागपूर केंद्रावरील नाट्य स्पर्धेत तिसरे पारितोषिक आणि गडकरींना प्रमाणपत्र मिळाले. डॉ. श्रीपाद जोशी, प्रभाकर आंबोणे व अशोक मिसाळ यांनी ' रसिक रंजन' ही नाट्य संस्था काढली आणि त्या मार्फत अनेक नाटकांचे दिग्दर्शन मदन गडकरींनी केले.
त्या अगोदर रंजन कला मंदीरशीही त्यांचा संबंध होता. तिथे ते सतारही वाजवत.पुढे ते नावारूपाला आले ते ए.जी.कार्यालयातील स्नेहसंमेलनात होणाऱ्या नाटकांमधून. 'आमचं नाव बाबूराव' हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक गाजले. ' तीन चौक तेरा' ह्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लोकप्रिय फार्स मध्ये त्यांनी श्रीपाद भालचंद्र जोशी यांचेसोबतच ए.जी. मधीलच कलावंत प्रभाकर आंबोणे, आणि ए.जी.बाहेरचे महेश रायपूरकर यांना प्रमुख भूमिका दिल्या होत्या.
त्यांची कारकीर्द खरी गाजली ती उद्धव शेळके यांच्या कादंबरीवर आधारित ' पोहा चाल्ला महादेवा ' या नाटकाने.त्या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार लाभला आणि राज्यभर ते नाटक गाजले.त्याचे अनेक प्रयोगही झाले.मैफिली माणूस म्हणून त्यांची ओळख होती.विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाचे डॉ मधुकर आष्टीकर अध्यक्ष असतांना ते सदस्य होते.