ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

By प्रविण खापरे | Published: August 30, 2022 05:54 PM2022-08-30T17:54:14+5:302022-08-30T18:00:01+5:30

रंगभूमीवरील निष्ठेने आणि त्याच्या अनुभवामुळे हौशी रंगकर्मींसाठी ते चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या प्रत्येक नाटकांना रसिकांसोबतच समीक्षकांचीही दाद मिळाली.

Veteran colorist, director Ganesh Naidu passes away, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar nitin gadkari express condolences | ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

Next

नागपूर : नाट्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास करून वैदर्भीय रंगभूमीला आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, प्रकाशयोजनेने आणि नेपथ्याने सजविणारे प्रख्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुलेखनकार गणेश नायडू यांचे मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तुषार व हेमंत ही मुले, स्नुषा, नातवंडे आणि असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

नागपूर-विदर्भाच्या रंगभूमीवर ५० वर्षाहून अधिक काळ गाजविणाऱ्या गणेश नायडू यांनी आपल्या रंगकर्मी जीवनात ८४ नाटकांचे नेपथ्य, ४५ नाटकांची प्रकाशयोजना, ३८ नाटकांमध्ये अभिनय व १८ नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. रंगभूमीवरील निष्ठेने आणि त्याच्या अनुभवामुळे हौशी रंगकर्मींसाठी ते चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या प्रत्येक नाटकांना रसिकांसोबतच समीक्षकांचीही दाद मिळाली.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाद्वारे आयोजित होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले आहे. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिपचेही मानकरी होते. त्यांच्याच मार्गदर्शनात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कर्नाटक येथील उडुप्पी येथील थिएटर वर्कशॉप पार पडले होते. यामिनी कृष्णमूर्ती, सीतारादेवी, पं. भीमसेन जोशी, वैजयंतीमाला, हेमामालिनी, जगजित सिंग अशा दिग्गजांच्या कार्यक्रमांचे प्रकाशनियोजन व नेपथ्य सजावट केली होती. गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर केला होता आणि तो कार्यक्रम नागपूर विधानभवनात पार पडला होता. त्या सोहळ्यात गणेश नायडू यांनी केलेल्या नेपथ्य सजावटीने लता मंगेशकर गहिवरल्या होत्या आणि त्यांनी त्यासाठी नायडू यांना विशेष दाद दिली होती.

नागपूरच्या कलाक्षेत्राची हानी

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नायडू यांचे जाणे ही नागपूरच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना.

- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते-परिवहन मंत्री, भारत सरकार

वैदर्भीय रंगभूमीचे भूषण

वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली. विविध कलागुण संपन्न असलेले नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. रंजन कला मंदिर नावारुपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आयुष्यभर अतिशय निष्ठेने नाट्यकलेची त्यांनी सेवा केली. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

हौशी रंगभूमीचा आधार हरपला

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी चा आधारवड हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. गणेश नायडू यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमी वर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत. राज्य शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांची अनेक नाटके पारितोषिक प्राप्त ठरली. विदर्भातील हौशी रंगभूमीच्या उत्कर्षा साठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियाना देवो ही प्रार्थना.

- सुधिर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: Veteran colorist, director Ganesh Naidu passes away, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar nitin gadkari express condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.