ज्येष्ठ रंगकर्मी रमेश अंभईकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:04+5:302021-08-24T04:11:04+5:30
नागपूर : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रमेश शंकर अंभईकर (७९, रा. जोशीवाडी, सीताबर्डी) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मोक्षधाम ...
नागपूर : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रमेश शंकर अंभईकर (७९, रा. जोशीवाडी, सीताबर्डी) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
मास्तर उपाख्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या रंजन कला मंदिरमध्ये घडलेले रमेश अंभईकर हे दारव्हेकरानंतर नागपुरातील सर्वश्रेष्ठ नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. ‘कालाय तस्मै नम:’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले पहिले नाटक होय, तर विदर्भ साहित्य संघाच्या रंगशारदा नाट्यगृहात दोन वर्षापूर्वी सादर झालेले ‘अंमलदार’ हे त्यांनी सादर केलेले अखेरचे नाटक होय. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक नाट्य शिबिरे झाली. नाटकात आवाज व उच्चारण हे त्यांच्या शिकवणीतील वैशिष्ट्य होते. शिस्तबद्ध तालमीतून नाटक उभे करण्यासाठी ते ओळखले जात. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाट्य प्रयोगांना विविध पारितोषिके प्राप्त झाली आहेत. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसह हिंदी नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. ग्रॅज्युएट, डोंगर म्हातारा झाला, रायबाई भुलाबाई, आम्ही लटिके ना बोलू, सभ्य गृहस्थ हो, रक्तपुष्प, रंगसावल्या आदी अनेक नाटके त्यांच्या दिग्दर्शनात उभी झालेली आहेत.
................