पशुवैद्यकीय विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:11 AM2021-09-12T04:11:12+5:302021-09-12T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. त्याशिवाय ग्रामीण भाग समृध्द आणि संपन्न होणार नाही. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शनिवारी पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या चिकित्सालयाच्या आधुनिक इमारतीचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खा. डॉ. विकास महात्मे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पातुरकर, सोमकुवर, सुधीर दिवे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, कृषी व ग्रामीण भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढविण्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाचे आहे. आधी ८५ टक्के भारत हा ग्रामीण भागात वास्तव्याला होता. पण नंतरच्या काळात ३० टक्के तरुणांनी शहराकडे स्थलांतर करणे सुरु केले. कारण ग्रामीण भागात रोजगार नाही, रस्ते, पाणी, खेळण्याची मैदाने नाही. त्यामुळेच आपल्या आर्थिक व्यवस्थेत प्रश्न निर्माण झाले. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी हा १४ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचे उत्पादन वाढविण्यात पशुवैद्यकीय विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या ३ वर्षात दुधाचे उत्पन्न ३ पट करून दाखवावे. हे करीत असताना आर्थिक अंकेक्षणासोबत अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे अंकेक्षणही केले जावे. तेही महत्त्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले.
रस्ते व महामार्गांची कामे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लागणाऱ्या मातीसाठी आम्ही तलाव करून देऊ. बोरगाव मंजूजवळ असाच तलाव प्राधिकरणाने करून दिला. आज त्या तलावात पाणी जमा झाले आहे. विदर्भात मालगुजारी तलावाच्या माध्यमातून गोड्या पाण्यातील झिंग्यांचे उत्पादनही वाढू शकते व त्यामुळे आपले उत्पादन डॉलरमध्ये जाऊ शकते. नवीन तंत्रज्ञान, संशोधन यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढवून आपण आत्मनिर्भरकडे गेले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.