‘विहिंप’ प्रार्थनास्थळ अतिक्रमण कारवाईवरुन करणार भजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:09 PM2018-07-05T18:09:10+5:302018-07-05T18:11:21+5:30
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असून या मुद्द्यावरुन ‘विहिंप’नेदेखील प्रशासनाविरोधात आघाडी उघडली आहे. प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भजन आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन डॉ.प्रवीण तोगडिया यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असून या मुद्द्यावरुन ‘विहिंप’नेदेखील प्रशासनाविरोधात आघाडी उघडली आहे. प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भजन आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन डॉ.प्रवीण तोगडिया यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकूणच या मुद्द्यावरुन दोन्ही संघटना विरोधाचे जास्तीत जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे कारण पुढे करून महापालिका व नासुप्र प्रशासनाने शहरातील मैदाने, ले-आऊ टमधील धार्मिक स्थळे तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे धार्मिक भावनांना धक्का बसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. मागील रविवारी सर्वधर्मिय समिती तसेच शहरातील विविध लोकप्रतिनिधींनी गडकरी यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्यानंतर गडकरींनीदेखील प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्र लिहून लोकवस्तीतील प्रार्थनास्थळे न पाडण्याची सूचना केली होती.
त्यानंतर कारवाई काहीशी थंडावली असताना विहिंप व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून या मुद्द्यावरुन आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. ‘विहिंप’, बजरंग दल व मंदिर बचाओ संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौकात सायंकाळी ५ वाजता भजन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे तर राज्य शासनाविरोधातच आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम येथून निदर्शनांना सुरुवात होणार आहे.