समृद्धीच्या मार्गे एसटी बस शिर्डीत साईच्या दारी; १५ डिसेंबरपासून विशेष सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:20 PM2022-12-12T19:20:02+5:302022-12-12T19:21:51+5:30
गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल.
नरेश डोंगरे
नागपूर - दळणवळणाचा मार्ग समृद्ध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यासाठी एसटी बस सज्ज आहे. गुरुवारी १५ डिसेंबरपासून एसटीची विशेष प्रवासी बस समृद्धी मार्गे रोज नागपूरहूनशिर्डीला जाणार आहे.
रविवारी या महामार्गाचे लोकार्पण झाले आणि लगेच अनेकांनी या मार्गाचा वापरही सुरू केला. खासगी प्रवासी बसच्या संचालकांना तर या महामार्गामुळे वेगळाच आनंद झाला आहे. कारण जेथे ७ ते ९ तास लागायचे ते नागपूर शिर्डी अंतर केवळ ५ तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांचे तीन तासांचा डिझेल अन् त्यापोटी होणारा हजारोंचा खर्च आता कमी होईल, अर्थात हा खर्च नफा म्हणून ट्रॅव्हल्स संचालकांच्या खिशात जमा होणार आहे. वेळ वाचणार म्हणून प्रवासीही ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार आहे. हा एकूणच सगळा जमा खर्च अन् लाभ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही आपली बससेवा समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी बससेवा सुरू होत आहे.
गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतून एक बस निघेला आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहचेल.
बसचे प्रवासभाडे १३०० रुपये आहे. या बसमध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची तर ६५पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकिटाची अर्धीच रक्कम द्यावी लागेल.
आरामदायक प्रवास सेवा
एसटीची ही बस आरामदायक, स्लिपरकोच असणार आहे. अर्थात जेवण करून रात्री बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या सकाळी शिर्डीत पोहचता येईल. रस्त्यात ती थांबणार नाही त्यामुळे प्रवशांना कसलाही व्यत्यय येणार नाही.