अजनी माॅडेल स्टेशनची व्यवहार्यताच संशयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:55+5:302021-01-18T04:07:55+5:30

नागपूर : महापालिकेच्या उद्यान विभागाने अजनी काॅलनी परिसरात ७००० हून अधिक झाडे असल्याचे नमूद केल्यानंतर इंटर माॅडेल स्टेशनबाबत राष्ट्रीय ...

The viability of the Ajni model station is in doubt | अजनी माॅडेल स्टेशनची व्यवहार्यताच संशयात

अजनी माॅडेल स्टेशनची व्यवहार्यताच संशयात

Next

नागपूर : महापालिकेच्या उद्यान विभागाने अजनी काॅलनी परिसरात ७००० हून अधिक झाडे असल्याचे नमूद केल्यानंतर इंटर माॅडेल स्टेशनबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने केलेल्या दाव्यांची हवा निघाली आहे. एनएचएआयद्वारे नियुक्त सल्लागार संस्थेने १९४० वृक्षांच्या आधारे माॅडेल स्टेशन प्रकल्पाचा प्लॅन तयार केला हाेता. मात्र, परिसरात वृक्षगणना अधिक हाेत असल्याने या प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यताच संशयाच्या भाेवऱ्यात सापडली आहे.

एनएचएआयने २०१७ मध्ये अपलिंका नामक सल्लागार कंपनीशी प्रकल्पाच्या नियाेजनासाठी करार केला हाेता. माजी मानद वन्यजीव संरक्षक जयदीप दास यांनी या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केला आहे. कंपनीने तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी दाेषपूर्ण सर्वेक्षण केल्याचा आराेप त्यांनी केला. ७००० झाडे गृहीत धरल्यास जलस्तर, तापमान, ऑक्सिजन, कार्बन एमिशन या सर्व गाेष्टींची परिस्थिती काय असेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सल्लागार कंपनीने आधी पर्यावरणीय मंजुरी (ईसी) घेतल्याचे नमूद केले. नंतर रेल्वे ट्रॅकचा प्रकल्प असल्याने सांगत मंजुरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेल्वेच्या २० हजार चाैरस फुटापेक्षा अधिकच्या बांधकामासाठी पर्यावरणीय मंजुरीची गरज पडते, याचाही विसर सल्लागार कंपनी व एनएचएआयला झाल्याची टीका दास यांनी केली. यावरून हा संपूर्ण प्रकल्पच संशयात असल्याचे दिसून येत आहे.

झाडे लावणार कुठे?

एनएचएआयने १९४० झाडे गृहीत धरून २५ हजार झाडे लावण्याची हमी दिली हाेती. तर ७००० झाडांच्या तुलनेत किती लावणार, हा प्रश्न आहे. नियमानुसार एका झाडामागे पाच झाडे निर्धारित केल्यास, किमान ३५००० झाडे लावावे लागतील. मात्र, महापालिकेच्या उद्यान विभागाच्या मते, माेठ्या प्रमाणात वृक्षाराेपण करण्यासाठी शहरात जागा नाही. मग ही झाडे लावणार कुठे, याचे उत्तर एनएचआयने द्यावे.

माहिती लपवली जात आहे का?

एनएचएआयतर्फे प्रकल्पाच्या ५५ एकरांतील पहिल्याच टप्प्यावर प्रकाश टाकला जाताे. हा संपूर्ण प्रकल्प ४९० एकरांतील आहे. त्यामुळे ३०००० हून अधिक झाडे ताेडली जाणार आहेत. एखाद्या प्रकल्पासाठी एवढ्या माेठया प्रमाणात वृक्षताेड पहिल्यांदाच हाेणार आहे. ही माेठी हानी असल्याचे जयदीप दास म्हणाले.

महापालिकेने ७००० झाडे असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आयएमएस प्रकल्पाच्या पर्यावरणीय व्यवहार्यतेवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे एनएचएआयने कागदी घाेडे नाचविण्याऐवजी प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन किती कमी हाेईल, ऑक्सिजनची काय स्थिती असेल, यावर सविस्तर माहिती सादर करायला हवी.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल, पर्यावरण संस्था

Web Title: The viability of the Ajni model station is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.