नागपुरातील वर्धा मार्गावर व्हायाडक्टचे कार्य अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 08:57 PM2018-11-20T20:57:38+5:302018-11-20T20:58:44+5:30
महा मेट्रो नागपूरच्या रिच-१ कॉरिडोरचे कार्य जवळपास पूर्ण होत आले असून सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या मेट्रो मार्गावर आता केवळ १३ स्पॅन उभारण्याचे कार्य शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महा मेट्रोनागपूरच्या रिच-१ कॉरिडोरचे कार्य जवळपास पूर्ण होत आले असून सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या मेट्रो मार्गावर आता केवळ १३ स्पॅन उभारण्याचे कार्य शिल्लक आहे. सात हायड्रॉलिक रिंगमुळे पाइलिंगचे ९५ टक्के कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावर मेट्रो मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे.
सोमलवाडा मेट्रो स्टेशनजवळ दोन, जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ तीन, रहाटे कॉलनीजवळ कृपलानी मेट्रो स्टेशन येथे एक आणि सीताबर्डी परिसरात सात मेट्रोचे स्पॅन लावण्याची प्रक्रिया सुरूआहे. यापैकी सोमलवाडा आणि जयप्रकाशनगर येथे सुरू असलेले स्पॅनचे कार्य या आठवठ्यात पूर्ण होणार आहे. शहरात मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावरील व्हायाडक्टचे कार्यदेखील अंतिम टप्यात असून निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी काहीच दिवस लागणार आहे.
मिहान मेट्रो डेपो ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत १२.५ किमी अंतर असून यात २९६ स्पॅन लागणे प्रस्तावित होते. यापैकी २७३ स्पॅन आतापर्यंत लावून झाले आहेत. वर्धा मार्गावरील मेट्रोचे आठ कि.मी. इतके अंतर व्हायाडक्टवर आहे. यादरम्यान रहाटे कॉलनीजवळ मेट्रोचे पॉकेट ट्रॅक आहेत. ०.५ कि.मी.चे हे पॉकेट तयार झाले आहेत. म्हणजेच मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास पुलावरून होणार आहे. रिच-१ कॉरिडोरमध्ये एकूण सात मेट्रो स्टेशन हे एलिव्हेटेड सेक्शनवर असेल. या मार्गावर पॉकेट ट्रॅकचे २० स्पॅन धरून एकूण ३१६ स्पॅन आहेत.
वर्धा मार्गावरील रिच-१ कॉरिडोरमध्ये १६५६ पाईल्स, ३०९ पाईलकॅप, ३०९ पियर, २८३ पियर कॅप्स, १३ पोर्टल बीम आणि ६२ पियर आर्म आहेत. यापैकी पाईल्स आणि पियर कॅप्सचे कार्य पूर्ण झाले आहे. तर केवळ पाच पियर्स, एक पियर कॅप, दोन पोर्टल बीम्स, पाच पियर आर्म आणि १३ स्पॅनचे कार्य आता पूर्ण होणे बाकी आहे. आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यकरिता सात हायड्रोलिक रिंगची तरतूद रिच-१ मध्ये करण्यात आली. यामुळे या भागातील एकूण ९५ टक्के पाइलिंगचे कार्य गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले आहे. तीन ओव्हरहेड लॉन्चिंग गर्डर आणि पाच ग्राऊंड लॉन्चिंग सिस्टीम या रिचमधील कार्यकरिता तैनात करण्यात आल्या आहेत.