उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज उपराजधानीत; नागपूर विद्यापीठाला देणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 10:26 AM2023-08-04T10:26:56+5:302023-08-04T10:30:06+5:30
नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी, ‘एनएडीटी’च्या कार्यक्रमात सहभागी होणार
नागपूर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ४ ऑगस्ट रोजी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्यांचे शहरात आगमन होणार असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात तसेच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) वार्षिक ‘प्रणिती’ कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नागपूरमध्ये आगमन होणार आहे.
उपराष्ट्रपती शुक्रवारी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहेत. दुपारी ३:३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याला ते उपस्थित राहतील. सायंकाळी ५:३० वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक ‘प्रणिती’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री ९:२० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपुरात राहतील.