उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 08:47 PM2021-12-31T20:47:51+5:302021-12-31T20:48:24+5:30
Nagpur News राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा वर्धा व यवतमाळ दौरा स्थगित करण्यात आला आहे.
नागपूर : भारताचे उपराष्ट्रपती महामहीम एम. व्यंकय्या नायडू ४ जानेवारी रोजी यवतमाळ व वर्धा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येणार होते. तसे नियोजनही करण्यात आले होते; मात्र राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा दौरा स्थगित करण्यात आला आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी सकाळी हवाईदलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल होऊन हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने वर्धा-सेवाग्रामला जाणार होते. तेथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून ते यवतमाळला रवाना होणार होते. जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटी यवतमाळद्वारा संचालित लोहारा येथील वीणादेवी दर्डा स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळ आणि मातोश्री वीणादेवी दर्डा यांचे समाधीस्थळ असलेल्या तुलसी वृंदावन येथे पुष्पांजली वाहणार होते.
सोबतच लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात येणार होता. याप्रसंगी ऐतिहासिक हनुमान आखाडा येथे उभारलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरणही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार होते.
या कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी झाली होती. पोलीस यंत्रणेनेही मॉक ड्रील करून सराव केला होता; मात्र कोरोना निर्बंध लागू झाल्यामुळे उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.