नागपुरातील वाडी भागात कुख्यात विक्की चव्हाणची निर्घृण हत्या : तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:34 PM2019-07-01T21:34:01+5:302019-07-01T21:35:25+5:30
कुख्यात गुंड विक्रम ऊर्फ विक्की अरुण चव्हाण (वय २७) याची रविवारी मध्यरात्री वाडीतील दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली. त्याच्या साथीदारालाही आरोपींनी शस्त्राचे घाव मारून जखमी केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडी, नागपूर : कुख्यात गुंड विक्रम ऊर्फ विक्की अरुण चव्हाण (वय २७) याची रविवारी मध्यरात्री वाडीतील दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली. त्याच्या साथीदारालाही आरोपींनी शस्त्राचे घाव मारून जखमी केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
विक्की चव्हाण शिवाजीनगर दख्खनी मोहला येथील रहिवासी होता. त्याच्यावर १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने आपली टोळी तयार केली असून, त्याचे अनेक गुन्हेगारांसोबत वैर होते. तो कुणावरही जाऊन पडायचा. रविवारी रात्री १० च्या सुमारास विक्कीचा मित्र आणि आरोपी अभिषेक राजेश वऱ्हाडपांडे (वय २२, रा. शिवाजीनगर वाडी) याच्या मित्रांच्या वाहनांची परस्परांना एमआयडीसीच्या वळणावर धडक लागली. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर विक्की त्याच्या गुंड मित्रांसोबत तेथे पोहचला. काही वेळानंतर वऱ्हाडपांडेही तेथे आला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. विक्की खतरनाक गुन्हेगार असल्याचे माहीत असल्याने वऱ्हाडपांडे तेथून निघून गेला. काही वेळेनंतर विक्की आपल्या साथीदारांना घेऊन वऱ्हाडपांडेच्या घरावर हल्ला करायला गेला. यावेळी तो घरी नसल्याने त्याने शिवीगाळ केली. वऱ्हाडपांडेच्या आईने त्याची कशीबशी समजूत काढून विक्कीला तेथून परत पाठविले.
दरम्यान, वऱ्हाडपांडेच्या मामाला ड्रंक न ड्राईव्हच्या कारवाईत पोलिसांनी पकडले होते. त्याला सोडवून मध्यरात्रीच्या सुमारास वऱ्हाडपांडे आणि त्याचा मित्र अर्पित नरेंद्र निंभोरकर (वय २६, रा. चतुर्भूज लेआऊट) घराकडे जात होते. रस्त्यात चावला कॉम्प्लेक्सच्या मागे पॅरागॉनच्या दुकानाजवळ विक्की चव्हाण आणि त्याचा साथीदार अभिषेक मुन्नाजी मेहरे (वय १९, रा. टेकडी वाडी) या दोघांनी निंभोरकर आणि अर्पितला अडवले. तेथे एमआयडीसी वळणावर झालेला वाद उकरून काढला. शिवीगाळ करून विक्कीने चाकू बाहेर काढला. विक्की खुनशी स्वभावाचा असल्याचे माहीत असल्याने आरोपी वऱ्हाडपांडे आणि निंभोरकरने विक्कीच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याच्यावर सपासप घाव घातले. त्याचा साथीदार अभिषेक मेहरे याच्यावरही चाकूचे घाव घालून त्याला जबर जखमी केले. त्यानंतर आरोपी ठाण्याकडे पळत गेले.
मेहरेने या घटनेची माहिती विक्कीचा भाऊ सागर तसेच अन्य साथीदारांना दिली आणि पोलिसांनाही कळविले. काही वेळेतच विक्कीला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, विक्कीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या त्याच्या साथीदारांनी सोमवारी सकाळी आरोपींच्या घरावर हल्ला चढवून नासधूस केली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. ते कळताच वाडीचे ठाणेदार पाठक, पोलीस उपनिरीक्षक चोपडे यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान मेहरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विक्कीच्या हत्येमुळे गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
मोक्का, तडीपार तरी मोकाट
विक्की चव्हाण हा खतरनाक गुन्हेगार होता. महिनाभरापूर्वी गिट्टीखदानमधील गुंडाच्या एका टोळीने त्याचा गेम करण्याचा कट रचला होता. त्यासाठी १० ते १५ सशस्त्र गुंडांनी तो बसून असलेल्या ठिकाणी हल्लाही चढवला होता. मात्र, काही वेळेपूर्वीच विक्की तेथून सटकल्याने बचावला. तर, त्यावेळी त्याच्या एका मित्रावर प्राणघातक हल्ला चढवून आरोपींनी त्याला जखमी केले होते. विक्कीचा गुन्हेगारी अहवाल लक्षात घेत त्याच्याविरुद्ध वरिष्ठांनी मोक्का, तडीपारीचीही कारवाई केली होती. मात्र, अवैध धंद्यांच्या माध्यमातून मोठी कमाई तसेच खंडणीतील हिश्श्यातून कुख्यात विक्की वाडी पोलीस ठाण्यातील काही जणांचे हित साधत असल्याने त्याच्या गुन्हेगारीकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते, असा आरोप आहे.