लिफ्टच्या खड्ड्यात आकांक्षाचा बळी
By admin | Published: February 1, 2016 02:40 AM2016-02-01T02:40:16+5:302016-02-01T02:40:16+5:30
निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला.
नरेंद्रनगरात शोककळा : दोषी कोण ?
नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे.
नरेंद्रनगरातील जय दुर्गा ले आऊटमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या भागात लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आला असून, त्यात पाणी साचले आहे. इमारत परिसरात राहणारी चिमुकली आकांक्षा खड्ड्यातील पाण्यात पडली. आवाज आल्यामुळे बाजूची मंडळी धावली.
तिला पाण्यातून काढून उपचाराकरिता खामल्यातील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ६.४८ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकांक्षाची आई चित्रलेखा रामकैलास नागपुरे (वय २६) यांनी दिलेल्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.(प्रतिनिधी)
धोक्याच्या ठिकाणी सुरक्षा नाही
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणच्या इमारत बांधकामस्थळी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले जातात. अवजड साहित्याची ने आण केली जाते. या धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची, आजूबाजूची निरागस मुले खेळत असतात. बाजूने जाणारे-येणारेही असतात. त्यांना धोका होऊ शकतो, याची जाणीव असूनदेखील तेथे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे या धोक्याच्या ठिकाणी निष्पाप जीवाचा बळी जातो. निरागस आकांक्षाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.