पोलीस ठाण्यासाठी माशांचा बळी
By admin | Published: May 8, 2017 02:22 AM2017-05-08T02:22:55+5:302017-05-08T02:22:55+5:30
दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे
पशुप्रेमी संघटनांकडून विरोध : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काम बंद करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे तयार करण्यात येत आहे. त्यासाठी तलाव बुजविण्याचे काम सुरू असून, यातील जलचर प्राण्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व पशुप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर तलाव बुजविण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
संजय गांधीनगर, म्हाळगीनगर येथे असलेल्या खदानीचे रूपांतर मागील ४५ वर्षांपूर्वी तलावात झाले. २५०० चौरस फूटमध्ये हा तलाव आहे. हा तलाव बुजवून त्याजागी हुडकेश्वर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी तलाव बुजविण्याचे कामही सुरू करण्यात आले. या तलावात सहा ते सात प्रकारच्या मासोळ्या आहेत. याशिवाय साप, कासव, पानकोंबडी आदी जलचर प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात तलावात आहेत. तलाव बुजवत असल्यामुळे मासोळ्या, कासव, पानकोंबडी, सापांचे अस्तित्व धोक्यात आहे.
या कामामुळे तलावातील मोठ्या प्रमाणात कासव व मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचे पशुप्रेमी संघटनेच्या निदर्शनास आले. तलावाच्या काठावर असंख्य मासोळ्या मृत पडलेल्या आढळल्या. किंग कोब्रा आॅर्गनायझेशन, युथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी, स्वप्निल बोथा व इतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूरच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्याकडून माहिती घेतली.
उपाध्ये यांनी घटनेचे गांभीर्य पाहून अभियंता अनिल देशमुख यांना तलाव बुजविण्याचे काम बंद करण्याचे निर्देश दिले व तलावातील जलचर प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाणाची व्यवस्था केल्यानंतरच बुजविण्याचे काम सुरू करावे, असे आदेशही दिले.
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीच नव्हती!
तलावात साप, कासव, पानकोंबडी असल्यामुळे वनविभागाने आधी जलचर प्राण्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, त्यानंतरच विकास काम करावे, असा नियम आहे. परंतु येथे नियमांना तिलांजली देऊन पशुक्रूरता करण्यात आली. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी समिती गठित करतात. संबंधित जागेवर जाऊन त्या ठिकाणी जलचर प्राणी आहे किंवा नाही याचे निरीक्षण करून, असल्यास त्यांना दुसऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच तलाव बुजविण्याचे काम सुरू झाले होते. आम्ही आवाज उठविल्यामुळे तलाव बुजविण्याच्या कामाला आता ब्रेक लागला आहे.
- अरविंदकुमार रुतडी, अध्यक्ष,
किंग कोब्रा आॅर्गनायझेशन