‘लुटेरी दुल्हन’च्या पीडितांची पोलिसांकडे कैफियत; ११ वर्षानंतर फुटले 'तिचे' बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 01:26 PM2022-05-09T13:26:25+5:302022-05-09T13:34:34+5:30
तिच्या छळाला बळी पडून सामाजिकरित्या उद्ध्वस्त झालेल्या पाच कुटुंबीयांनी पोलिसांकडे तिच्या पापाचा पाढा वाचला आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : स्वत:च लग्नाची ऑफर देऊन शरीरसंबंध प्रस्थापित करायचे अन् नंतर दागिने आणि तगडी रोख रक्कम घेऊन पळ काढायचा. मागावर आलेल्या नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध छळाची तक्रार नोंदवायची अन् बदल्यात त्यांच्याकडून खंडणी उकळायची, असा अफलातून फंडा वापरणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’चे पाप आता आढ्यावर चढून ओरडत आहे. तिच्या छळाला बळी पडून सामाजिकरित्या उद्ध्वस्त झालेल्या पाच कुटुंबीयांनी पोलिसांकडे तिच्या पापाचा पाढा वाचला आहे.
मेघाली उर्फ मोना, उर्फ भाविका, उर्फ भावना (वय ३७) कमालीची धूर्त आहे. महेंद्र वनवानी (वय ३२) नामक पीडित तरुणाच्या धिटाईमुळे तिचे बिंग फुटले अन् ती कोठडीत पोहचली. दरम्यानच्या पोलीस तपासात तिच्याकडून छळल्या गेलेल्या अर्धा डझन व्यक्तींनी पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली आहे. त्यानुसार, मूळची सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मेघाली हिचे २००१ मध्ये कवठा रेल्वे (देवळी, जि. वर्धा) येथील कमलेश सोबत लग्न झाले. एक मुलगा अन् मुलगी झाल्यानंतर तिला कमलेशचा वीट आला. घरी येणारा कमलेशचा मित्र नितीन सोबत तिने अनैतिक संबंध जोडले. त्याचा बोभाटा झाल्यानंतर नवऱ्यावर बलात्कार आणि सासरच्यांवर छळाचा गुन्हा दाखल करून तिने घरातील रोख व दागिने पळविले.
नितीनसोबत २०११ ला संसार थाटल्यानंतर चार-पाच वर्षांतच तगडी रक्कम अन् दागिने घेऊन त्याच्याविरुद्धही पुलगाव ठाण्यात बलात्कार करून जाळून ठार मारण्याची तक्रार नोंदवली. नितीनला गुंडाळण्यापूर्वीच पुलगावचाच प्लास्टिक दुकानदार सुरेशला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न केले. त्याचाही अशाच पद्धतीने गेम केला. तेथे तिची पद्धत लक्षात आल्यानंतर तिने पुलगावातून पळ काढला अन् नागपुरात सपाटा लावून असाच अनेकांचा गेम केला. बुटीबोरीतील कंपनीचा अधिकारी, एमआयडीसीतील दुसरा एक अधिकारी आणि नंदनवनमध्येही वेगवेगळ्या व्यक्तीवर असाच फंडा वापरला. पोलिसांची कारवाई आणि बदनामीच्या धाकाने तिला तीन ते चार जणांनी लाखोंची खंडणी देऊन आपली मानगूट सोडवून घेतली.
१) सत्यम शिवम सुंदरमची नायिका...
सत्यम, शिवम सुंदरमची नायिका झिनत अमान ज्या प्रमाणे आपला जळालेला चेहरा शशी कपूरला दिसू देत नव्हती, तशीच काळजी मेघालीही घेते. तिचा जळलेला गालाखालचा भाग ती ‘सावजाची शिकार’करेपर्यंत त्याला दिसूच देत नाही. सेलूच्या शिक्षकाचीही तिने अशीच शिकार केल्याचे समजते.
२) पोलिसांवरही लावला आरोप
खंडणीबाज मेघालीने जरीपटक्यातील महेंद्र वनवानीविरुद्ध अनैसर्गिक बलात्काराची तर कुटुंबीयांविरुद्ध छळाची तक्रार नोंदवून घरातील रोख व सोने लंपास केले. महेंद्रची कारागृहात भेट घेऊन २.१० लाखांची खंडणीही उकळली. तपासादरम्यान एका प्रामाणिक महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला नाश्ता विकत आणायला लावल्याची तक्रार करून तिलाही अडचणीत आणले.
३) अखेर बुरखा फाटला
कारागृहातून बाहेर आल्यानंतर महेंद्र वनवानीने तिच्या ब्लॅकमेलिंगचे पुरावे पोलिसांना देऊन तिचा बुरखा फाडला. तिचा खरा चेहरा उघड झाल्यानंतर जरीपटक्याचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विद्या काळे यांनी तपास सुरू केला. त्यानंतर कवठा (देवळी), पुलगाव, सेलूमधील पीडितांनी पोलिसांकडे आपली कैफियत मांडून मेघालीच्या रुपातील ‘लुटेरी दुल्हन’चे किस्से उघड केले.