स्वाईन फ्लूने दोघांचा बळी
By admin | Published: September 26, 2015 02:54 AM2015-09-26T02:54:01+5:302015-09-26T02:54:01+5:30
बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर : बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांची प्रकृती सुरुवातीपासून अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात गेल्या २६ दिवसांत स्वाईन फ्लूने सात रुग्णांचा बळी घेतला आहे. रामकृष्ण भटकर (३०) रा. दर्यापूर, अमरावती व ताराबाई निपाणी (६४) रा. कळमना, नागपूर अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण भटकर १२ सप्टेंबरपासून अकोला मेडिकल रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधार होत नसल्याने त्याला २१ सप्टेंबर रोजी नागपूर मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, रामकृष्ण याची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ताराबाई निपाणी यांना २० सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. २१ सप्टेंबर रोजी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले.गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)