कोंबडीने घेतला महिलेचा बळी
By admin | Published: August 25, 2015 03:59 AM2015-08-25T03:59:22+5:302015-08-25T03:59:22+5:30
कोंबडी हा प्राणी तसा भेकड अन् निरुपद्रवी जीव. ती फारशी कुणाच्या वाट्याला जात नाही. तिच्या पिलांना धोका
नागपूर : कोंबडी हा प्राणी तसा भेकड अन् निरुपद्रवी जीव. ती फारशी कुणाच्या वाट्याला जात नाही. तिच्या पिलांना धोका असल्याचे लक्षात आल्यानंतरच ती दुसऱ्याच्या अंगावर धावून जाते. मात्र हीच कोंबडी कुणाच्या जीवावर उठू शकते, असे म्हटले तर अनेकांना ते अतिशयोक्ती वाटू शकते. परंतु ही अतिशयोक्ती नाही. कोंबडीने एका महिलेचा बळी घेतला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ५.३० वाजता ही विचित्र घटना घडली.
अजनीतील बजरंगनगरात राहणाऱ्या सुकेशिनी योगिराज दहीवले (वय २९) या त्यांची मुलगी तसेच पती योगिराज भजन दहीवले (वय ३९) हिरो होंडा स्प्लेंडरने दीक्षाभूमी येथे जात होते. घराजवळच्या रस्त्यावर अचानक एक कोंबडी त्यांच्या पती योगिराज यांच्या डोक्यावर येऊन बसली. त्यामुळे ते गोंधळले. परिणामी त्यांचे नियंत्रण बिघडून दहीवले परिवार खाली पडला. सुकेशिनी यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पोलिसांना पडला प्रश्न
या विचित्र अपघाताची सर्वत्र चर्चा असून, सुकेशिनी यांच्या मृत्यूला कारणीभूत कोंबडी असल्याचे माहीत असले तरी तिच्याविरुद्ध गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तूर्त अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.(प्रतिनिधी)
माटे चौकात कुत्र्याने केला अनर्थ
अशाच प्रकारे २० आॅगस्टच्या रात्री ७.१५ वाजता शशिकांत देवाजी पोफरे (वय ५०, रा. अभ्यंकरनगर) हे आपल्या बजाज पल्सरने जात होते. माटे चौकाजवळ श्रद्धानंद आश्रमच्या विरुद्ध बाजूला अचानक कुत्रा आडवा आल्याने पोकरे यांनी कुत्र्याला वाचविण्याकरिता करकचून ब्रेक दाबले. त्यामुळे दुचाकीचे नियंत्रण बिघडून ते डिव्हायडरवर पडले. गंभीर जखमी झालेल्या पोकरेंना उपचाराकरिता सिम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्नेहल विनोद पोकरे (वय २८) यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.