नागपुरात ट्रकचालकाने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:48 PM2018-12-29T23:48:39+5:302018-12-29T23:49:27+5:30
एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
आबिद अन्सारी मोहम्मद जमाल (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुंदनलाल गुप्तानगरात राहत होता. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आबिद मोटरसायकलने कुंदनलाल गुप्तानगरातून कळमन्यात जात होता. राजीवनगर उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची मोठी गर्दी असते. असे असूनही आरोपी ट्रकचालक अविनाश दशरथ येरवार (वय २५, रा. बोधवडी, किनवट, जि. नांदेड) याने निष्काळजीपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या आबिदच्या मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे आबिद गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित करण्यात आले.
या अपघातामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर मोहम्मद जावेद अन्सारी (वय २९) यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी ट्रकचालक येरवारला अटक केली.
अपघातात आणखी एकाचा बळी
जयताळा परिसरात राहणारे राहुल दत्ताराम कुलकर्णी (वय ४१) यांचा अपघाती मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ११. ते ११.३० च्या सुमारास ते एमआयडीसीतून घराकडे येत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाºयावर त्यांची दुचाकी गेली. त्यामुळे तोंडाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना हिंगण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी संजय परूनाथ दाताळीकर (वय ३१, रा. एनआयटी गार्डन जवळ) यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.