माशांऐवजी पक्ष्यांचाच बळी

By admin | Published: May 1, 2016 03:05 AM2016-05-01T03:05:20+5:302016-05-01T03:05:20+5:30

नागपूर व वर्धा जिल्ह्यासाठी वैभव समजले जाणारे बोरधरण हे आता पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

Victims of birds instead of fish | माशांऐवजी पक्ष्यांचाच बळी

माशांऐवजी पक्ष्यांचाच बळी

Next

बोरधरणातील प्रकार : मासेमाऱ्यांचे जाळे ठरताहेत कर्दनकाळ
मनोज झाडे कान्होलीबारा
नागपूर व वर्धा जिल्ह्यासाठी वैभव समजले जाणारे बोरधरण हे आता पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. कारण, या धरणात मुबलक जलसाठा असल्याने तिथे मासेमारी केली जाते. मासेमारी करण्यासाठी धरणातील झाडांच्या खुंटांना बांधण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये पक्षी अडकत असल्याने तसेच एकदा अडकल्यानंतर त्यातून सुटका करवून घेणे शक्य नसल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे सदर धरण पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे.
बोरधरण नुकतेच अभयारण्य घोषित करण्यात आले असून, हे देशातील सर्वात लहान अभयारण्य आहे. बोरधरण व बोर वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या प्राणी व पक्ष्यांमुळे हे अभयारण्य अल्पावधीत वन्यप्रेमी, पक्षी निरीक्षक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. बोरधरणात मुबलक पाणीसाठा असल्याने तसेच परिसरातील वातावरण अनुकूल असल्याने या ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बरीच मोठी आहे. धरणाच्या सभोताल फिरणाऱ्या पक्ष्यांमुळे धरणाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे या ठिकाणी मासेमारी केली जाते. त्यासाठी धरणाचा लिलाव करून संबंधिताला मासेमारीचा परवाना दिला जातो. मासेमारीसाठी नायलॉनच्या धाग्यांचे मोठमोठे जाळे धरणात टाकले जातात. धरणाच्या सीमांकनासाठी या जाळ्यांच्या वरच्या भागाला प्लास्टिकच्या बाटल्या बांधल्या जातात. या बाटल्या हलक्या असल्याने पाण्यावर तरंगतात. पावसाळा सुरू होताच मासेमारी बंद केली जाते. मात्र, धरणातील जाळे काढले जात नाही. पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने जाळे वर येते आणि धरणात असलेल्या झाडांच्या खुंटांना अडकतात. नायलॉनचे धागे पाण्यात सडत नसल्याने ते बराच काळ टिकतात.
सध्या धरणातील झाडांना मासेमारीचे जाळे काही ठिकाणी अडकले असल्याचे दिसून येते. या धरणाच्या परिसरात वास्तव्याला असलेले पक्षी या झाडांना अडकलेल्या जाळ्यात अडकतात. हे धागे मजबूत राहत असल्याने त्यात अडकलेल्या पक्ष्यांना जाळ्यातून स्वत:ची सुटका करवून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक पक्ष्यांचा जाळ्यात अडकून मृत्यू होतो तर काही पक्ष्यांची सुटका झालीच तर त्यांना जखमा होतात. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पक्ष्यांच्रूा जीवितास धोका उद्भवत आहे.

साफसफाई अभियान
बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन व बहार नेचर फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यामाने धरणातील झाडांना अडकलेले जाळे, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या काढण्यासाठी साफसफाई अभियान राबविण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात जाळे, पिशव्या व बाटल्या काढण्यात आल्या. परंतु धरणातील संपूर्ण जाळे व पिशव्या काढणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी या जाळ्यांमध्ये प्राण्यांची हाडे अडकल्याचेही आढळून आले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. धरणातील जाळे काढण्याची प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नाही.

प्रशासनाने लक्ष द्यावे
मासेमारीसाठी बोरधरणाचा बोरधरण प्रशासनाकडून लिलाव केला जातो. यातून प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळत असून, लिलाव घेणाऱ्याशी मासेमारीचा करार केला जातो. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन जाळ्यांचा वापर केला जातो. सदर जाळे काढण्याची तसेच धरणाच्या ‘बॅक वॉटर’ भागाची व वनक्षेत्रालगतच्या भागाची साफसफाई करण्याची व्यवस्था बोरधरण प्रशासनाने करायला हवी. कारण, हे जाळे वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत.
- संजय इंगळे,
सदस्य, बोर व्याघ्र प्रकल्प सल्लागार समिती.

Web Title: Victims of birds instead of fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.