पीडित विद्यार्थिनीचा दावा, कुलगुरूंना दिली होती माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:34 PM2018-03-06T22:34:38+5:302018-03-06T22:35:01+5:30
एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणात माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर आणि पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री वैष्णव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे कारवाई झाली नसल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले. परंतु या प्रकरणाची सप्टेंबर २०१७ मध्येच कुलगुरूंना माहिती दिली होती व त्यांनी कारवाईचे आश्वासनदेखील दिले होते, असा दावा संबंधित पीडित विद्यार्थिनीने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणात माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर आणि पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री वैष्णव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे कारवाई झाली नसल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले. परंतु या प्रकरणाची सप्टेंबर २०१७ मध्येच कुलगुरूंना माहिती दिली होती व त्यांनी कारवाईचे आश्वासनदेखील दिले होते, असा दावा संबंधित पीडित विद्यार्थिनीने केला आहे.
डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला तर, या गंभीर गुन्ह्यात पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जयश्री वैष्णव यांनीही साथ दिली. तसेच त्यांनी दडपण आणून गप्प करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने अंबाझरी पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीवरून डॉ. पाराशर आणि डॉ. वैष्णव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात आम्हाला पोलिसांकडून कुठलीही कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रकरणात सध्या कुठलेही पाऊल उचललेले नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले होते.
या मुद्यावर संबंधित विद्यार्थिनीने मंगळवारी कुलगुरुंना पत्र सादर केले. ११ सप्टेंबर २०१७ रोजी कुलगुरुंना आपल्यासोबत झालेल्या शारीरिक व मानसिक छळवणुकीची माहिती दिली होती. कुलगुरुंनी माझे बोलणे ऐकून तर घेतले मात्र जास्त बोलू न देता महिला सुरक्षारक्षकाला बोलावून मला दालनाबाहेर जाण्याची सूचना केली. या प्रकरणात तुम्ही पोलिसात तक्रार करा. आम्हीदेखील कारवाई करू, असेदेखील त्यांनी मला सांगितले, असा दावा या विद्यार्थिनीने पत्राच्या माध्यमातून केला आहे. यासंदर्भात मी फेब्रुवारी २०१८ रोजी कुलगुरूंना परत भेटले. परंतु त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे मी अखेर पोलिसात तक्रार केली, असेदेखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे सध्या सुटीवर आहेत. यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
विद्यापीठातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासा
संबंधित विभागप्रमुखांच्या अन्यायकारक वागणुकीसंदर्भात काही विद्यार्थिनींनी आवाज उठविला होता. परंतु त्यांना दाद देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत माझे गाऱ्हाणे मांडले. भीतीपोटीच मी पत्रदेखील दिले नाही. परंतु मी कुलगुरूंना भेटले होते ही बाब सत्य असून त्या दिवशीचे ‘सीसीटीव्ही फुटेज’देखील तपासले जावेत, असे त्या विद्यार्थिनीने पत्रात नमूद केले आहे.