तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न : छळ अन् बलात्काराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:13 AM2019-05-29T00:13:54+5:302019-05-29T00:16:13+5:30
विवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून एका तरुणीचा वाद विकोपाला गेल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्यांनी तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. नंतर तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध लैंगिक छळासह अनेक आरोप लावले. प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडून अंबाझरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून एका तरुणीचा वाद विकोपाला गेल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्यांनी तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. नंतर तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध लैंगिक छळासह अनेक आरोप लावले. प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडून अंबाझरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रार करणारी तरुणी आणि ज्याच्यावर तिने बलात्काराचा आरोप लावला तो आरोपी अमरावती जिल्ह्यातील लोणी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील वाद वाढला. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी तरुणीने अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करताच तिने घूमजाव केले. आपल्याला तक्रार द्यायची नाही, असे स्वत:च तिने पोलिसांना लिहून दिले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले. दरम्यान, या दोघांमधील वाद गेल्या आठ दिवसांत पुन्हा तीव्र झाला. त्यामुळे तिने मंगळवारी दुपारी नागपूर गाठले. ती सरळ गांधीसागर तलावावर पोहचली. तिने उडी घेताच तिला काहींनी पाण्यातून बाहेर काढले. तेथे जमलेल्या गर्दीत विवाहित प्रियकराच्या छळामुळे आपण आत्महत्या करणार होती, असे तिने सांगितले. त्यामुळे काहींनी गणेशपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. प्रकरणाची सुरुवात अंबाझरी ठाण्यातून झाल्याचे कळाल्याने, त्यांनी तिला अंबाझरी पोलीस ठाण्यात पाठविले. येथे पोलिसांनी तिची सविस्तर तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध बलात्कार करून धमकी दिल्याचा आरोप लावल्याचे समजते.
पोलिसांची सावध कारवाई
या प्रकरणात तिचा पूर्वानुभव आल्यामुळे पोलिसांनी तिची सावधगिरीने विचारपूस केली. त्यानंतर तिची तिच्याच हस्ताक्षरात प्रारंभी तक्रार लिहून घेतली, नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत वृत्त लिहिस्तोवर अंबाझरी पोलिसांकडून मिळाले होते. मात्र, ऐनवेळी तिने घूमजाव करू नये आणि प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून अंबाझरी पोलीस रात्री ११ पर्यंत गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत होते.