संविधान चौकात आशा कर्मचाऱ्यांचा आयटक संपाचा विजयोत्सव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:00+5:302021-06-25T04:07:00+5:30
नागपूर : मागील ९ दिवसांपासून सुरू असलेल्या संपातील मागण्यांवर राज्य शासनाने तोडगा काढल्याने आशा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी संविधान चौकात ...
नागपूर : मागील ९ दिवसांपासून सुरू असलेल्या संपातील मागण्यांवर राज्य शासनाने तोडगा काढल्याने आशा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी संविधान चौकात विजयोत्सव साजरा केला. या विजयाचे प्रतीक म्हणून चौकात वडाच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले. आशा कर्मचाऱ्यांनी १५ जूनपासून राज्यव्यापी संपाला सुरुवात केली होती. नागपुरातही आयटकच्या नेेतृत्वात संप सुरू होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शासनाकडे पैसा नसल्यामुळे मानधन वाढ शक्य नाही, असे सांगून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. अखेर संपाच्या नवव्या दिवशी सरकारने मानधन वाढीचा आणि अन्य मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील पत्र प्राप्त झाल्यावर संप मागे घेण्याची घोषणा करून गुरुवारी सकाळी आयटकच्या राज्य सरचिटणीस श्याम काळे यांच्या अध्यक्षतेखाली विजयोत्सव सभा झाली.
मंदा डोंगरे, संगिता गौतम, अंगणवाडी नेत्या ज्योती अंडरसहारे, जयश्री चहांदे, भाकप नेते युगल रायलु, ॲड.आनंद गजभिये, सुकुमार दामले, आशा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंगला पांडे, जि.प.सदस्य अंवतिका लेकुरवाळे, रेखा तागडे, किसान सभेचे नेते अरुण वनकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा सचिव मंगला लोखंडे यांनी तर आभार फुलन घुटके यांनी मानले. जिल्हाभरातील आशा कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.