हा संपूर्ण समाजाचा विजय -मुकेश चांडक
By admin | Published: May 6, 2016 03:00 AM2016-05-06T03:00:17+5:302016-05-06T03:00:17+5:30
हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली.
हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निर्णयाविरुद्ध आरोपी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास त्यांची शिक्षा कायम ठेवण्यासाठी आपणही अर्ज सादर करू . प्रकरण वरच्या न्यायालयात आल्यानंतर प्रामुख्याने तपासातील त्रुटीवर बोट ठेवले जाते. यामुळे आरोपींची फाशी कायम राहील की नाही अशी भीती वाटत होती. परंतु, आरोपी हत्या व अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरतील, असा विश्वास होता. बरेचदा फाशी देण्यापूर्वी आरोपीचे वय व गुन्हेगारीचा पूर्व इतिहास लक्षात घेतला जातो. अशा प्रकरणात याला महत्त्व द्यायला नको. आठ वर्षाच्या निरागस मुलाची हत्या करताना आरोपींनी कशाचाच विचार केला नाही. त्यांच्या कुप्रवृत्तीचा बळी ठरलो हे माझे दुर्दैव आहे असे सांगून चांडक यांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले.
दहा कोटी रुपयांची मागणी : युगची हत्या केल्यानंतर आरोपींनी डॉ. चांडक यांना दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी तर, दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली होती. युग सायंकाळ होऊनही घरी न परतल्यामुळे डॉ. चांडक यांनी त्यापूर्वीच लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांसह राजेशलाही ठाण्यात बोलावले होते. पोलिसांना राजेशच्या चेहऱ्यावरील हावभावात तफावत दिसत होती. यामुळे राजेशवरील शंका बळावली होती. पोलिसांनी कठोरतेने घेतल्यानंतर राजेशने चक्क युगची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.