विजयी लेकीची घोड्यावरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:39+5:302021-01-20T04:10:39+5:30
उमरेड : विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोण, कोणती शक्कल लावेल, याचा नेम नाही. ग्रा.पं.निवडणुकीतील विजयानंतर गिरगाव (ता. करवीर) येथे ...
उमरेड : विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोण, कोणती शक्कल लावेल, याचा नेम नाही. ग्रा.पं.निवडणुकीतील विजयानंतर गिरगाव (ता. करवीर) येथे विजयी पत्नीला पतींनी उचलून घेतले, तर पाळू (ता. खेड) येथील विजयी पतीला अगदी खांद्यावर घेत, पत्नीने विजयोत्सव साजरा केला. असाच काहीसा आनंदोत्सव उमरेड (जि.नागपूर) तालुक्यातील बोरीमजरा येथे साजरा करण्यात आला. ग्रा.पं. निवडणुकीतील विजयानंतर गावकऱ्यांनी २४ वर्षीय शितल मनोहर सहारे हिची घोड्यावरून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. शितलने सावंगी खुर्द या ग्रा.पं. च्या निवडणूकीत अनुसूचित जमाती गटात १९७ मते घेत बाजी मारली. तिची प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल गावंडे हिला १५६ मते मिळाली. ४१ मतांनी शितल विजयी होताच, गावकऱ्यांनीच घोड्यावरून मिरवणूक काढत विजयोत्सव साजरा करण्याचा चंग बांधला आणि तो पूर्णत्वास नेला. गावात प्रत्येकाने घोड्यावर बसलेल्या शितलचे औक्षवंत करीत स्वागत केले. शितल नागपुरातील इन्स्ट्यिूट ऑफ सायन्स येथून फिजिक्स या विषयात एमएस्सी झालेले आहे. तिचे वडील मनोहर आणि आई संगीता मोलमजुरी करतात. परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शितल गावातच होती. लोकआग्रहास्तव आणि आपणही निवडणूक लढून बघू या, असा निर्धार करीत तिने ही निवडणूक अपक्ष लढविली. शिक्षणाचा राजकीय आणि सामाजिक कामात उत्तम उपयोग करावयाचा संकल्प यावेळी तिने व्यक्त केला. शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना कसा मिळवून देता येईल, याकडे लक्ष देणार असल्याचे तिने सांगितले.