उपेक्षांचे शिकार नागपुरातील इतवारी शहीद स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:55 PM2019-04-24T21:55:11+5:302019-04-24T22:01:27+5:30
स्वातंत्र्यापूर्वी वर्ष १९४२ च्या आंदोलनाच्या इतिहासाला उजाळा देणारे इतवारी येथील शहीद स्मारक उपेक्षांचे शिकार ठरले आहे. स्मारक आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे आहे. शहिदांची आठवण होईल, असा एकही कार्यक्रम या ठिकाणी होत नाही. शहराची धरोहर असलेल्या स्मारकाची देखरेख, दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हे स्मारक इतिहासाच्या नोंदीतून नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी वर्ष १९४२ च्या आंदोलनाच्या इतिहासाला उजाळा देणारे इतवारी येथील शहीद स्मारक उपेक्षांचे शिकार ठरले आहे. स्मारक आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे आहे. शहिदांची आठवण होईल, असा एकही कार्यक्रम या ठिकाणी होत नाही. शहराची धरोहर असलेल्या स्मारकाची देखरेख, दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हे स्मारक इतिहासाच्या नोंदीतून नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्मारकाचे विदु्रपीकरण
सदर प्रतिनिधीने ऐतिहासिक स्मारकाची पाहणी केली असता, अनेक दिवसांपासून स्मारकाच्या परिसराची साफसफाई न झाल्यामुळे सभोवताल कचऱ्याचा ढीग दिसून आला. परिसराच्या एका कोपऱ्यात रेतीचे पोते तर एका बाजूला पावभाजी ठेलेचालकांच्या प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या. स्मारकाच्या परिसरात कुत्रे आराम करीत होते. स्मारकाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. काही असामाजिक तत्त्वांनी स्मारकासमोरील शिलालेखावर कोरलेल्या महापुरुषांच्या चित्रांवर काळ्या अक्षरांनी खोडखाड केल्याचे दिसून आले. अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इतवारीतील अतिक्रमण काढतात. पण स्मारकासभोवतालचे अतिक्रमण आर्थिक व्यवहारामुळे दुर्लक्षित करतात, असा आरोप नागरिकांनी लोकमतशी बोलताना केला.
अवैध होर्डिंग्जचा कब्जा
शहिदांची आठवण जिवंत ठेवणाऱ्या परिसरात अवैध होर्डिंग्जचा कब्जा आहे. होर्डिंग्ज हटविण्याचे काम मनपाचे आहे, पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लोकांना शहीद स्मारक कमी तर अवैध होर्डिंग्ज जास्त दिसून येतात. या परिसरात कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे आसपासचे दुकानदार कचरा या परिसरात फेकतात. स्मारकाच्या लोखंडी रॉडला कपडे बांधले आहेत. त्यामुळे परिसराचे विदु्रपीकरण झाले आहे.
सुरक्षा भिंतीचे गेट वारंवार तोडतात दुकानदार
शहीद स्मारक परिसराला सुरक्षा भिंत असून, तीन लहान गेट लावले आहेत. असामाजिक तत्त्वांचा वावर कमी करण्यासाठी वरिष्ठ नागरिकांनी या गेटला अनेकदा कुलूप लावले, पण पावभाजी ठेलेचालक आणि दुकानदारांनी कुलूप प्रत्येक वेळी तोडले आहे. यासंदर्भात अनेकदा वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. स्मारकाच्या विदु्रपीकरणाची तक्रार तहसील ठाण्याचे अधिकारी घेत नाहीत. अतिक्रमण करणाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार असल्यामुळे अधिकारी साधी दखलही घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
महापुरुषांच्या कोरलेल्या मूर्ती
चार पायऱ्या चढून गेल्यानंतर उंच शहीद स्तंभ आहे. त्यामागे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. बाजूलाच माँ चंडिका माता मंदिर आणि स्मारकालगत हनुमान मंदिर आहे. मंदिरात आलेले भाविक कचरा आणि दुर्गंधीमुळे परिसरात बसत नाहीत. हा परिसर अनेकदा स्वच्छ केला आहे. पण पावभाजी विकणारे अतिक्रमणधारक स्मारक परिसरात उरलेले खाद्यान्न वारंवार टाकतात. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त तक्रारी केल्या आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन मनपा आणि पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
२८ लाखांत सौंदर्यीकरण
नासुप्रची ट्रस्टी असताना २८ लाख रुपये खर्च करून ऐतिहासिक शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण केले होते. पण आता स्मारकाची देखरेख करण्यास कुणीही नाही. मनपाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. स्मारकाच्या परिसरात अतिक्रमण आणि कचऱ्याचा ढीग असल्यामुळे लोकांचेही स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वात आधी मनपाने स्मारकच्या परिसराबाहेरील पावभाजीचे ठेले हटवावे आणि दररोज झाडझूड करून परिसर स्वच्छ ठेवावा. हायमास्टपैकी अनेक लाईट बंद आहेत. हा परिसर स्वच्छ ठेवल्यास शहिदांच्या आठवणींना पुन्हा उजाळा येईल.
आभा पांडे, नगरसेविका.
शहीद स्मारकाचा इतिहास
आताचे शहीद स्मारक आणि पूर्वीचे मैदान स्वातंत्र्यपूर्वी वर्ष १९४२ ला झालेल्या ‘चले जाव’ आंदोलनाचे नागपूरचे केंद्र होते. स्मारकावर अनेक महापुरुषांच्या नावाचा उल्लेख आहे. आंदोलनादरम्यान जुन्या भंडारा रोडवर झालेल्या गोळीबारात जवळपास आठजण शहीद झाले होते. हा चौक गोळीबार चौक म्हणून ओळखला जातो. आंदोलनकर्त्यांनी इतवारीतील पोस्ट ऑफिस जाळल्याची नोंद आहे. या चौकात नागपुरातील नामांकित राजकीय नेत्यांची बैठक होती. महात्मा भगवान दिन, पूनमचंद रांका, लालचंद मोदी, प्यारेलाल गोयल, महादेव मोदी, पन्नालाल देवडिया, भोलासिंग नायक, रामचंद्रसाव लांजेवार, विद्यावती देवडिया, दीनदयाल गुप्ता, वामनराव गावंडे यांच्यासह अनेकविध नेत्यांच्या उपस्थितीने हा चौक नेहमी गजबजला आहे.
डॉ. संतोष मोदी