भारत-पाकिस्तान युद्धाची विजयी मशाल नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:09 AM2021-01-22T04:09:51+5:302021-01-22T04:09:51+5:30
नागपूर : १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त ...
नागपूर : १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त दिल्ली येथून काढण्यात आलेली सुवर्ण विजयी मशाल नागपुरात दाखल झाली आहे. कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटर तसेच सीताबर्डी किल्ला आणि साेनेगावच्या एअरफाेर्स स्टेशनवर शानदार परेड काढून मशालीचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयात दाखल हाेईल.
२०२१ हे वर्ष भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाचे सुवर्ण महाेत्सवी वर्ष आहे. १६ डिसेंबर २०२० रोजी ऐतिहासिक युद्धाचे ५० व्या वर्षात पदार्पण होताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीय जवानांच्या कर्तृत्वाचा गाैरव करण्यासाठी सुवर्ण विजयी मशाल दिल्ली येथून रवाना केली हाेती. ही मशाल आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, भाेपाळ, इटारसी हाेत बुधवारी संत्रानगरीत पाेहोचली. कॅप्टन अनिरुद्ध नायर हे देशभरात हाेणाऱ्या या सुवर्ण विजयी मशाल मार्चचे नेतृत्व करीत आहेत.
कामठी रेजिमेंटमध्ये जल्लाेषात स्वागत
कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटरमध्ये या विजयी मशालीचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले. सैनिकांनी ऑटाेमाेटिव्ह चाैक ते कामठी राेडवर दाेन्ही बाजूला दाेन किमीपर्यंत लांब मानवी साखळी बनवली हाेती. त्यांच्या मध्यातून ही मशाल माजी सैनिक व १९७१ च्या वाॅर हीराेजकडून रिले करण्यात आली. या वेळी युद्धातील हीराेज असलेले कर्नल जाली, कर्नल अभय पटवर्धन, स्क्वाॅड्रन लीडर सुबित मुखर्जी, कॅप्टन नटराजन अय्यर व कॅप्टन एम.टी. वखारे यांचा सहभाग हाेता.
साेनेगाव एअरफाेर्स स्टेशनवर परेड
गुरुवारी सकाळी विजयी मशाल सीताबर्डी किल्लास्थित उत्तर महाराष्ट्र व गुजरात सबएरिया येथे पाेहोचली. येथे मानवंदना दिल्यानंतर साेनेगावस्थित एअरफाेर्स स्टेशन येथे आणण्यात आली. या वेळी स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन कंचन कुमार व एएफडब्ल्यूडब्ल्यूएच्या प्रेसिडेंट मीनाक्षी राॅय यांच्या उपस्थितीत आकर्षक परेड काढून मानवंदना देण्यात आली. या वेळी वाॅर हीराेज व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरस्थित मेंटेनन्स कमांड मुख्यालयात पाेहोचणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण
सुवर्ण विजयी मशाल येते ७ दिवस नागपुरात राहणार आहे. २६ जानेवारी राेजी कस्तुरचंद पार्क येथे हाेणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड आणि समाराेहाचे ते मुख्य आकर्षण ठरणार आहे. या वेळी १९७१ चे वाॅर हीराेज आणि माजी सैनिकांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी सांगितले.