विदर्भात ६६.२३ टक्के कोरोनारुग्ण बरे; ५३२ रुग्ण व १६ मृत्यूची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:58 PM2020-08-02T22:58:34+5:302020-08-02T22:59:31+5:30
देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात रविवारी ५३२ नव्या रुग्णांची व १६ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १६१६१ झाली असून मृतांची संख्या ४२०वर पोहचली आहे. १०७०५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४८१९ रुग्ण उपचाराखाली आहेत. देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण देशात २.१५ टक्के असताना विदर्भात किंचित जास्त २.५९ टक्के आहे. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे.
गेल्या पाच दिवसापासून रोज ५०० वर रुग्णांची नोंद होत आहे. विशेषत: नागपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा २३५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५८९७ वर पोहचली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद मंगळवारी झाली. १५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर गेली आहे. ३६१५ रुग्ण बरे तर १९६७ रुग्ण उपचार घेत आहेत. नागपूरसोबतच अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ घातला आहे. या जिल्ह्यात ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या २२९४ तर मृत्यूची संख्या ६१ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ३९६ झाली आहे. जिल्ह्यात तीन मृत्यूची नोंद आहे.
बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण्संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या १३९९ झाली आहे. ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ३४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णसंख्या ६५४ झाली आहे. १६ मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची ११४५ झाली असून ३३ मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. बाधितांची संख्या ५७० झाली आहे. जिल्ह्यात मात्र एकच मृत्यू आहे. भंडारा जिल्ह्यात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या २७१ वर पोहचली आहे. दोन मृत्यूची नोंद आहे.
अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा मंदावली. १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ११० वर पोहचली आहे. वर्धा जिल्ह्यात सात रुग्णांना बाधा झाल्याने रुग्णसंख्या २४९ झाली आहे, नऊ मृत्यूची नोंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णसंख्या ६०७ तर मृत्यूची संख्या एकवर स्थिरावली आहे.