विदर्भात कोरोना बाधितांची संख्या सात : ११ संशयितांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:44 PM2020-03-16T20:44:08+5:302020-03-16T20:45:11+5:30
दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन तर विदर्भात सात झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर पडली.
यवतमाळ जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण सोडल्यास विदर्भात नागपूरसह इतर ठिकाणी गेल्या दोन दिवसात एकही बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. रविवारी मेडिकलमधील २९, मेयोमधील आठ, यवतामळ व चंद्रपूर जिल्ह्यामधील प्रत्येकी दोन-दोन असे एकूण ४१ नमुने तपासण्यात आले. यातील ४० नमुने निगेटिव्ह आले. तर यवतमाळ जिल्ह्यातील एका संशयित महिलेच्या नमुन्याची तपासणी सोमवारी करण्यात आली, यात ती पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे, या पूर्वी पाठविण्यात आलेल्या या महिलेचा नमुन्यांचा अहवाल १३ मार्च रोजी निगेटिव्ह आला होता. परंतु पुन्हा साप, सर्दी, खोकला व अंगदुखी ही लक्षणे आढळून आल्याने रविवारी त्यांचे नमुने नागपुरात पाठविण्यात आले होते.
सोमवारी पहिल्या टप्प्यात मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये नागपूर मेडिकलमधील तीन, मेयोमधील चार, वर्धेमधील एक तर खामगावमधील तीन असे एकूण ११ नमुन्यांचा समावेश होता. यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.