नागपुरात विदर्भवादी आणि पोलिसांमध्ये उडाली धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 07:08 PM2021-08-26T19:08:27+5:302021-08-26T19:10:04+5:30
Nagpur News वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती, कोरोनाकाळातील वीज बिल माफी आणि इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको-जेल भरो आंदोलनात गुरुवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती, कोरोनाकाळातील वीज बिल माफी आणि इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको-जेल भरो आंदोलनात गुरुवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पुरुषांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अडविल्या. बसची चावी हिसकावून बसेस बंद पाडल्या. पोलिसांनी फरफटत नेऊन आणि उचलून कार्यकर्त्यांना वाहनात कोंबून ताब्यात घेतले. (Vidarbha activists and police clash in Nagpur)
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकारात राम नेवले व प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वामध्ये गणेशपेठ बसस्थानक चौकात हे आंदोलन झाले. सुमारे साडेबारा वाजताच्या सुमारास घोषणाबाजी करत आंदोलनकांनी रस्ता अडवून धरला. प्रवेशद्वाराजवळ मार्गावर बसपुढे आडवे पडून कार्यकर्ते व महिलांनी बसेसचा मार्ग अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांचे हातपाय धरून उचलून व्हॅनमध्ये कोंबले. मुकेश मासुरकर यांनी चालकाकडून बसची चावी हिसकावून घेतली. यामुळे बराच वेळपर्यंत बस थांबून होती. राम नेवले व मुकेश मासुरकर यांना अटक करून वाहनात कोंबल्यावर महिला पदाधिकारी ज्योती खांडेकर, सुनिता येरणे, रेखा निमजे, जया चातुरकर, वीणा भोयर, शोभा येवले, उषा लांबट, संगीता अंबारे यांनी बससमोर आडवे पडून मार्ग रोखला.
सुमारे अर्धा तासपर्यंत ही पकडापकडी, कोंबाकोंबी आणि घोषणाबाजी सुरू होती. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना पकडून नेल्यानंतर रस्ता सुरू झाला. पुन्हा काही वेळाने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी येऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी या सर्वांना हुसकावून लावले. अटकेतील कार्यकर्त्यांना टाकळी पोलीस मुख्यालय येथे नेण्यात आले. भादंविच्या कलम १८८, २६९, ३४१, ३५ कलमानुसार कारवाई करून सायंकाळी सुटका केली.
आंदोलकांवर दंडुकेशाही : येवले यांचा आरोप
आंदोलकांवर पोलिसांनी दंडुकेशाही केल्याचा आरोप राम नेवले यांनी निषेध नोंदविला आहे. ज्योती खांडेकर यांना उचलून गाडीत कोंबत असताना डोक्याला मार लागला, पोलिसांनी महिला आंदोलकांच्या अस्ताव्यस्त कपड्याचीही पर्वा केली नाही, असा आरोप त्यांनी केला.
...