विदर्भवाद्यांचे ‘हॉर्न बजाओ’ आंदोलन पोलिसांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:28 PM2021-02-25T23:28:08+5:302021-02-25T23:31:00+5:30
Vidarbha activists' 'Horn Bajao' agitation कर्जावर घेतलेल्या टॅक्सीची किस्त माफ करणे, व्याज न लावणे आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी ‘हॉर्न बजाओ’ आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु पोलिसांनी हॉर्न वाजवण्यापूर्वीच वाहनांना जॅमर लावून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन होऊ दिले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्जावर घेतलेल्या टॅक्सीची किस्त माफ करणे, व्याज न लावणे आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी ‘हॉर्न बजाओ’ आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु पोलिसांनी हॉर्न वाजवण्यापूर्वीच वाहनांना जॅमर लावून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन होऊ दिले नाही.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वाहतूक आघाडीने यशवंत स्टेडियम येथून मोचा काढून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर ‘हॉर्न बजाओ’ आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दुपारी १२ वाजता विदर्भवादी यशवंत स्टेडियमजवळ जमा होऊ लागले. हॉर्न वाजवण्यासाठी जवळपास ४० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हा मोर्चा गडकरी यांच्या निवासस्थानाकडे निघण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पोहोचले. त्यांनी वाहनांना जॅमर लावले. कार्यकर्त्यांनी विरोध केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांचे म्हणणे होते की, नागपुरात कोरोना मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे आंदोलनाला परवानगी देता येत नाही. तसेही राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. परंतु कार्यकर्ता ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही कार्यकर्ते गडकरी यांच्या वर्धारोडवरील निवासस्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.
आंदोलनात नौशाद हुसैन, गुलाबराव धांडे, उषा लांबट, विजय मौंदेकर, अशोक पटले, संजय राऊत, संजय जिभे, आशिष दुरुगकर, दीपक साने, नकुल गमे, देवीदास धात्रक, सज्जाद शेख, विकास बोथलवार, सतीश बावने, हिमांशू जयकुमार, ऋषी कुंवर आदींचा समावेश होता.