खासदारांच्या कार्यालयात जाऊन विदर्भवादी मागणार राजीनामा - वामनराव चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 12:29 PM2022-10-20T12:29:50+5:302022-10-20T13:09:17+5:30
हिवाळी अधिवेशनावर करणार हल्लाबोल
नागपूर : लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेत येऊनही विदर्भाचे राज्य मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या विदर्भातील १० खासदारांच्या कार्यालयात जाऊन ११ नोव्हेंबरला विदर्भवादी त्यांचा राजीनामा मागणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वामनराव चटप म्हणाले, १९ ऑक्टोबरला गिरीपेठ येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भवाद्यांची बैठक झाली. यात मिशन २०२३ संपेपर्यंत आर-पारची लढाई लढण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार १० नोव्हेंबरपर्यंत विदर्भातील १० खासदारांच्या मतदार संघातील विदर्भवादी वेगळ्या विदर्भाबाबत त्यांची काय भूमिका आहे, याचा जाब पोस्टाद्वारे आणि ई-मेलद्वारे मागणार आहेत. त्यानंतर ११ नोव्हेंबरला खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा राजीनामा मागण्यात येणार आहे. विदर्भ राज्य मिळवून देण्यात अपयशी ठरल्यामुळे खासदारांनी खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, वेगळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारला भाग पाडावे, यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १९ डिसेंबरला विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. यात १० हजार विदर्भवादी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, नरेश निमजे, मुकेश मासुरकर, प्रबीर कुमार चक्रवर्ती, रेखा निमजे, रंजना मामर्डे, सुधा पावडे आदी उपस्थित होते.