हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदचा उडाला भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 09:56 AM2017-12-12T09:56:25+5:302017-12-12T09:57:45+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ बंद पुकारण्यात आला होता. नागपुरात या बंदचा भडका उडाला.
हैदोस घालणाऱ्यांना नागरिक व पोलिसांनी दिला चोप
सीताबर्डी परिसरात शांततेत आंदोलन
आॅनलाईन लोकमत
नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ बंद पुकारण्यात आला होता. नागपुरात या बंदचा भडका उडाला. सीताबर्डी परिसरात शांततेत तर गांजाखेत, इतवारी, तहसील परिसरात आंदोलनाने उग्र रूप धारण केले. या आंदोलनाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद लाभला असला तरी विदर्भातील सर्वात मोठा धान्य बाजार असलेले कळमना मार्केट बंद राहिले, हे विशेष. अनेक विदर्भवाद्यांना यावेळी अटक करण्यात आली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदची हाक दिली होती. अनेक संघटनांनी या बंदला समर्थपणे पाठिंबा दर्शवित सहभाग नोंदविला. सोमवारी सकाळी शहीद चौक, सीताबर्डी, गांजाखेत आदी परिसरात विदर्भवादी संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. व्हेरायटी चौक येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमार्फत सीताबर्डी, झांशी राणी चौक, मुंजे चौक, मोदी नंबर १, २ व ३ या व्यावसायिक परिसरात फिरून व्यापाºयांना शांततेत आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी आपापली दुकाने स्वत:हून बंदही केली. या रॅलीमध्ये माजी आमदार वामनराव चटप, उपेंद्र शेंडे, राम नेवले आदींसह अडीचशेवर कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली मुंजे चौक, धंतोलीमार्गे लोकमतच चौकाकडे निघाली. लोकमत चौकात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे गांजाखेत, इतवारी येथे मात्र विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले. इतवारी गांजाखेत येथे ख्वाजा शेख आणि मुकेश मासुरकर यांनी टायर जाळून निदर्शने केली. दरम्यान काही शोरूमच्या काचाही फोडण्यात आल्याने पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. गांजाखेत चौकात सकाळी काही युवकांनी रस्त्याच्या मध्ये टायर जाळून नारेबाजी केली. दरम्यान तोंडाला फडके बांधून आलेल्या युवकांनी परिसरातील कपड्यांच्या दुकानांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दुकानदार मनीष केवलरामानी आणि राजेश कुकरेजा यांच्या दुकानांचे काच फुटले. गांजाखेत चौक ते तीननल चौकापर्यंत आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी बळजबरीने वाहनांना रोखले. इतवारी येथे हैदोस घालणाऱ्या युवकांना नागरिकांनीच चोप दिला. विदर्भ आंदोलनाच्या नावाने फिरत असलेल्या दोन तरुणांना तहसील पोलिसांनी अटक केली.
या आंदोलनाला राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, जनमंच, विदर्भ कनेक्ट, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे), भीमसेना, विदर्भ गण परिषद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, माजी खासदार दत्ता मेघे यांची विदर्भ राज्य विकास परिषद, बहुजन सेना, बळीराजा पार्टी, झोपडपट्टी समस्या निवारण संघ, टायगर आॅटोरिक्षा संघटना, नाग-विदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्स, अखिल हिंद फारवर्ड ब्लॉक आदीेंसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता.