विधान भवनावर धडकणार विदर्भ दिंडी यात्रा
By admin | Published: October 29, 2016 02:21 AM2016-10-29T02:21:21+5:302016-10-29T02:21:21+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती : ५ डिसेंबरला मोर्चा
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. विदर्भाच्या पाच सीमांवरून ही विदर्भ दिंडी निघेल आणि ती ५ डिसेंबर रोजी नागपुरात विधान भवनावर धडकेल.
५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मोर्चा काढून विदर्भ राज्य ‘देता की जाता’ असा जाब सरकारला विचारला जाईल. या मोर्चासाठी विदर्भाच्या पाच सीमांवरून विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येत आहे. पहिली दिंडी ही सिंदखेडराजा (बुलडाणा) येथून १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता निघेल. देऊळगाव, चिखली, मेहकर, रिसोड, वाशिम, पातूर, बार्शी टाकळी, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, तिवसा, तळेगाव, कारंजा घाडगे, कोंढाळी, हिंगणा मार्गे नागपूरला पोहोचेल.
दुसरी दिंडी शेंडगाव (दर्यापूर) येथून ३० नोव्हेंबरला निघेल. दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबजार, मोर्शी, वरुड, जलालखेडा, मोवाड, नरखेड, सावरगाव, काटोल, कळमेश्वर, सावनेर, खापा, पाटणसावंगीमार्गे पोहोचेल.
तिसरी दिंडी उमरखेड येथून १ डिसेंबरला निघेल. महागाव, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, वडकी, वडनेर, हिंगणघाट, समुद्रपूर, सेवाग्राम, वर्धा, पवनार, सेलू, सिंदी (रेल्वे), बुटीबोरी मार्गे पोहोचेल.
चौथी दिंडी कालेश्वर (गडचिरोली) येथून १ डिसेंबरला निघेल. सिरोंचा, अहेरी, गडचिरोली, आरमोरी, वडसा, ब्रह्मपुरी, नेरी, भिवापूर, उमरेड, कुही मार्गे पोहचेल.
पाचवी दिंडी देवरी (गोंदिया) येथून १ डिसेंबरला निघेल. गोरेगाव, गोंदिया, तिरोडा, तुमसर, मोहाडी, भंडारा, जवाहरनगर, मौदा, चाचेर, रामटेक, कन्हान, कामठी मार्गे पोहचेल.
यासंदर्भातील तयारी व यात्रादरम्यान करण्यात येणाऱ्या जनजागृतीसंदर्भात समितीच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खंदेवाले, अॅड. नंदा पराते, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, पुरुषोत्तम पाटील, अॅड. आनंदराव वंजारी, अॅड. टी.बी. कटरे, अॅड. अर्चना नंदघले, दिलीप नरवडीया, मधुभाऊ कुकडे, दिलीप बन्सोड, रामरतन राऊत, सरोज काशीकर, रफिक रंगरेज, मिलिंद पाटील, राजेंद्रसिंग ठाकूर, शालिक पाटील नाकाडे, अरुण मुनघाटे, डॉ. दीपक मुंडे, तुषार हट्टेवार, किशेर पातणवार, प्रभाकर दिवे, शैला देशपांडे अॅड. सुरेश वानखेडे, अॅड. विजय राऊत, धर्मराज रेवतकर, अनिल तिडके, विष्णूपंत वानखेडे, भीमराव फुसे, श्याम वाघ प्रामुख्याने उपस्थित होेते. (प्रतिनिधी)